अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ६ जुलै - पुणे जिल्हा आणि घाट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना, वस्त्यांना आणि संवेदनशील भागातील नागरिकांना तातडीचा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दौंड पुलाजवळून २४,०४९ क्युसेक विसर्ग; वाढण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रासाठी 'रेड अलर्ट' (अतिवृष्टीचा इशारा) जारी केला आहे. सततच्या पावसामुळे भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळी वाढली आहे. आज (६ जुलै) सकाळी १० वाजता भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून २४,०४९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, आगामी काळात पाऊस असाच सुरू राहिल्यास विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.
प्रशासनाचे आपत्कालीन यंत्रणेला कडक निर्देश
संभाव्य पूरस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत:
कर्मचारी २४ तास तैनात: सर्व विभागांच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांमध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांना सतत कार्यरत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अन्नधान्य व औषध साठा: मुसळधार पावसामुळे संपर्क तुटण्याची शक्यता असलेल्या गावांमध्ये अन्नधान्य, औषधे आणि आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
सुरक्षित स्थलांतर: पूरबाधित क्षेत्रातील गर्भवती महिला, आजारी व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींचे संभाव्य पूरस्थितीचा विचार करून आधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्षतेचे आदेश
धोकादायक पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध व्हावी यासाठी संबंधित सर्व विभागांनी दक्ष राहावे. अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दादासाहेब गिते यांनी दिल्या आहेत.
नागरिकांसाठी प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन:
नदीपात्र आणि नदीकाठापासून नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे.
नदीकाठावर वास्तव्यास असणाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडण्याचा जीवघेणा प्रयत्न करू नये.
सेल्फी काढण्यासाठी किंवा पूर पाहण्यासाठी नदीकाठी गर्दी करू नये.