मुंबई, (प्रतिनिधी) ६ जुलै - गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोकणासह रायगड जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. याशिवाय वरंधा घाटातही अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
कशेडी घाटात दरड; नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर
कशेडी घाटाजवळ डोंगराचा भाग खचून मोठी दरड महामार्गावर आली. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) पथक ढिगारा हटवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून काम वेगात सुरू आहे. परिसरात पाऊस आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कामात अडथळे येत आहेत. दरम्यान, दरडीचा काही भाग जवळच असलेल्या निवासी वस्तीत घुसल्याने, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
वरंधा घाटात ४ ते ५ ठिकाणी दरडी कोसळल्या
रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वरंधा घाटातील वारवंड ते उंबर्डे हद्दीदरम्यान तब्बल चार ते पाच ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. रस्त्यावर आलेले भलेमोठे दगड आणि मातीचे ढिगारे हटवण्याचे काम सुरू असून, सुरक्षेच्या कारणास्तव सध्या या घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
म्हाप्रळ-आंबेत पुलाला बार्जेस धडकल्या; वाहतूक रोखली
रायगड जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ-आंबेत पुलाजवळ एक गंभीर घटना घडली आहे. महाड तालुक्यातील काही बार्जेस (मालवाहू जहाजे) पाण्याच्या तीव्र प्रवाहाने वाहून आल्या आणि या पुलाजवळ अडकल्या. यामुळे पुलाच्या संरचनेला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलत मंडणगड - म्हाप्रळ - गोरेगाव - माणगाव ही वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. घटनास्थळी पोलीस, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी आवश्यक उपाययोजना करत आहेत.
पेण-खोपोली रस्ता पाण्याखाली; अंबा नदीकाठून १२ कामगारांची सुटका
पेण-खोपोली मुख्य रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून रस्त्यावर पाणी आल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुसरीकडे, सुधागड तालुक्यातील कानसळ येथे अंबा नदीच्या वाढत्या जलस्तरामुळे १२ कामगार अडकले होते. स्थानिक प्रशासनाने आणि बचाव पथकाने तत्परता दाखवत या सर्व १२ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद असणे किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने नियंत्रण कक्षाशी आणि संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. तसेच, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे; अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.