चाकण, (प्रतिनिधी) ६ जुलै - चाकण आणि खेड परिसरात रात्रभर आणि आज दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने प्रचंड हैदोस घातला आहे. या मुसळधार पावसामुळे ओढ्या-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी थेट पुणे-नाशिक महामार्गावर आल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप आले आहे. वाकी खुर्द, तळेगाव चौक आणि आंबेठाण चौकाजवळ रस्त्यावर तब्बल ३ ते ५ फुटांपर्यंत पाणी साचल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महामार्गावर पाण्याचा वेढा पडल्याने प्रवासी, चाकरमाने आणि वाहनचालकांचे अतोनात हाल होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बसमधील ५० प्रवाशांची सुखरूप सुटका; शेकडो वाहने पाण्यात
महामार्गावर अचानक पाणी वाढल्याने प्रवाशांनी भरलेल्या बस पुराच्या पाण्यात अडकल्या होत्या. बसमध्ये अडकलेल्या सुमारे ५० हून अधिक प्रवाशांना चाकण नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी जीवाची बाजी लावून सुखरूप बाहेर काढले. याशिवाय, एका कंपनीच्या १०० हून अधिक दुचाकी, अनेक कार आणि इतर वाहने पाण्यात बुडाली आहेत.
जेसीबीने डिव्हायडर फोडून पाणी काढण्याचे काम सुरू
महामार्गावर साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने शेवटी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्त्याचे डिव्हायडर फोडून पाणी काढून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसात सातत्य असल्याने आणि पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रस्त्यावरील पाणी कमी होत नसल्याचे चित्र आहे.
मूळ समस्या काय? ओढे बुजवले, बांधकामे केली!
वाकी खुर्द येथील या भीषण परिस्थितीला प्रशासकीय निष्काळजीपणा आणि अनधिकृत बांधकामे कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.
अतिक्रमणाचा विळखा: वाकी खुर्द येथील 'परदेशी दरा' कडून वाकी गावाकडे येणाऱ्या मुख्य ओढ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.
नदीचा मार्ग रोखला: काही प्लॉटिंगधारकांनी ओढे आणि नाले बुजवून त्यावर सर्रास बांधकामे केली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी भीमा नदीकडे जाण्यात मोठा अडथळा निर्माण झाला असून ते महामार्गावर आणि सखल भागात साचत आहे