मुंबई, (प्रतिनिधी) ६ जुलै - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) ‘लालपरी’ ही केवळ सर्वसामान्यांच्या प्रवासी वाहतुकीचे साधन नसून राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, सुरक्षिततेची आणि उज्ज्वल भविष्याची विश्वासू जीवनवाहिनी बनली आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याचे सामाजिक दायित्व एसटी महामंडळ अनेक दशकांपासून प्रभावीपणे पार पाडत असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देत शालेय वेळेत बसस्थानकांवर विशेष पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. हे कर्मचारी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसमध्ये चढण्यास मदत करतात. तसेच, प्रवासादरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाने स्वतंत्र टोल-फ्री मदत केंद्र सुरू केले आहे, ज्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
दररोज ३०,१७७ शालेय फेऱ्या; सवलतींचा पाऊस
राज्यात दररोज सुमारे ३० हजार १७७ शालेय फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांना सुरक्षित व नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडथळा येऊ नये, यासाठी एसटी महामंडळ विविध सवलतींच्या योजना प्रभावीपणे राबवत आहे:
अहिल्यादेवी होळकर योजना: ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना १०० टक्के मोफत प्रवासाची सुविधा.
मासिक विद्यार्थी पास: नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पासवर तब्बल ६६.६७ टक्के सवलत.
शैक्षणिक आणि इतर प्रवास: शैक्षणिक सहली, उन्हाळी सुट्टी, परीक्षा, शैक्षणिक शिबिरे किंवा आजारी पालकांना भेट देण्यासाठीच्या प्रवासासाठी ५० टक्के सवलत.
कौशल्याला बळ: कौशल्य सेतू अभियानांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासभाड्यात ६६.६७ टक्के सवलत.
५३ लाखांहून अधिक पासेसचे वितरण; आता 'स्मार्ट कार्ड' युग
आर्थिक वर्ष २०२५-२६ या कालावधीत महामंडळाने केलेली कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे. या वर्षात तब्बल २५.१३ लाख अहिल्यादेवी होळकर पास आणि २७.९८ लाख विद्यार्थी मासिक पास वितरित करण्यात आले आहेत. आता हा प्रवास अधिक सुलभ, आधुनिक आणि पारदर्शक करण्यासाठी विद्यार्थ्यांना एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, मानव विकास योजनेअंतर्गत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ९६६ विशेष बसेसद्वारे ७३ हजार ६२१ मुलींना मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची सारथी: प्रताप सरनाईक
"एसटीची ‘लालपरी’ ही आज केवळ रस्त्यावर धावणारी बस नसून प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांची सारथी, प्रत्येक पालकाच्या विश्वासाची हमी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत धावणारी ज्ञानवाहिनी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा दीप अखंड तेवत ठेवण्यासाठी एसटी महामंडळ अधिक सक्षमपणे, संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने कार्य करत राहील."
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री व अध्यक्ष, एसटी महामंडळ