राज्याला पावसाचा विळखा... कुठे रेड अलर्ट? कुठे मुसळधार? असा आहे हवामानाचा इशारा...

Share:
Main Image
Last updated: 06-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ६ जुलै - राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाने दुर्घटनांची मालिका सुरूच ठेवली असून जीवितहानीसह जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. अशातच आज, ६ जुलै रोजी देखील पावसाचा कहर कायम राहणार असून हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणात पावसाचे तांडव; रायगडला अतिवृष्टीचा इशारा

मुंबईप्रमाणेच कोकणातही मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने आज पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याने 'रेड अलर्ट' घोषित करण्यात आला आहे.

रायगडमध्ये नद्यांनी ओलांडली धोकापातळी; दरडी कोसळल्या

रायगडमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा आणि उल्हास नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली असून सर्वच नद्या धोका पातळीबाहेर वाहत आहेत. खोपोली, महाड, कर्जत, रोहा, नागोठणे, पेण आणि पोलादपूर शहरांत पुराचे पाणी साचले आहे. अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून, काही भागांत दरडी कोसळल्यामुळे अनेक प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांत पहाटेपासून जलमय परिस्थिती

मुंबईत आज आठवड्याचा पहिलाच कार्यालयीन दिवस (सोमवार) असून पहाटेपासूनच पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांच्या गतीवर कमालीचा परिणाम झाला आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीची माहिती घ्यावी आणि अत्यावश्यक काम असल्यास, पुरेसा वेळ हाताशी ठेवूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नालासोपाऱ्यात 'होर्डिंग' कोसळले; स्टेशन परिसरात शुकशुकाट

Advertisement

नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून रस्त्यांवर कमरेभर पाणी साचले आहे. चाकरमानी जीव धोक्यात घालून स्थानकाकडे जात आहेत. दरम्यान, या परिसरात एक भलेमोठे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नेहमी गजबजलेल्या या स्टेशन परिसरात आज पुरामुळे शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

राज्याच्या इतर भागांतील स्थिती:

पुणे आणि सातारा: पुणे शहरासाठी पावसाचा 'यलो अलर्ट' असला, तरी पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.

नाशिक: नाशिक जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' असून घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.

विदर्भ: अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रशासनाचा हलगर्जीपणा: भामरागडमध्ये ७ गावांचा संपर्क तुटला

गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातील गुंडेनूर नाल्याला आलेल्या पुरामुळे गुंडेनूर, पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमरका, दामनमर्का यांसह तब्बल सात गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. विशेष म्हणजे या नाल्यावरील पुलाच्या कामाची मुदत संपूनही ते अपूर्णच राहिल्याने ग्रामस्थांवर जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना तासन्‌तास पूर ओसरण्याची वाट पाहावी लागत आहे. "पावसाळ्यापूर्वी पूल पूर्ण झाला असता तर ही नौबत आली नसती," अशी संतप्त भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.