पुणे, (प्रतिनिधी) ५ जुलै - पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांच्या मायलेज आणि इंजिनवर परिणाम होत असल्याच्या चर्चा आणि तक्रारी देशभरात सुरू असतानाच, 'द ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया'ने (ARAI) यावर महत्त्वाची तांत्रिक स्पष्टीकरणे दिली आहेत. E20 (२० टक्के इथेनॉल-मिश्रित इंधन) मुळे इंजिनच्या कार्यक्षमतेवर अतिशय नगण्य (अत्यल्प) परिणाम होत असून, इंजिन दीर्घकाळासाठी कार्यक्षम राहत असल्याचे ४०,००० ते ६०,००० किलोमीटरच्या व्यापक प्रत्यक्ष व प्रयोगशाळा चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे, अशी ग्वाही 'ARAI'चे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी दिली. 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत भारतात वाहन-इंधन म्हणून E20 च्या वापराबाबत ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी पुणे (कोथरूड) येथील कॉर्पोरेट मुख्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. मथाई यांच्यासह वरिष्ठ संचालकांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
कठोर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रमाणीकरण
E20 इंधनाशी सुसंगत असलेली सर्व वाहने व्यावसायिक बाजारपेठेत आणण्यापूर्वी अत्यंत कठोर आणि संरचित प्रमाणीकरण तसेच पडताळणी प्रक्रियेतून जातात, असे समितीने स्पष्ट केले. ही प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानके आणि 'ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स'च्या (OEM) विशिष्ट चाचणी मानकांची पूर्ण पूर्तता करते. या मूल्यमापनामुळे इथेनॉल मिश्रणाचा इंजिन, इंधनवाहिन्या (फ्यूल लाईन्स) आणि इतर भागांवर होणारा परिणाम तपासला जातो, ज्यामुळे गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित होते.
मायलेजवर अवघा २ ते ६ टक्के परिणाम
वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेबाबत (मायलेज) स्पष्टीकरण देताना संस्थेने सांगितले की:
मान्यताप्राप्त वाहनांवर केलेल्या प्रमाणित प्रयोगशाळा चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, E20 इंधनामुळे इंधन क्षमतेत होणारी घट अत्यंत मर्यादित म्हणजेच केवळ २% ते ६% या श्रेणीत राहते.
प्रत्यक्ष वापरातील मायलेजमधील तफावत ही केवळ इंधनामुळे नसून वाहनचालकाची वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती आणि वाहनाची मूळ स्थिती या बाह्य घटकांवरही अवलंबून असते.
ग्राहकांसाठी 'ARAI'चा महत्त्वाचा सल्ला
"E20 इंधनाशी सुसंगत असणारी BS VI वाहने देशात आणणे हे भारताच्या शाश्वत आणि आत्मनिर्भर पुरवठा साखळीच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह मालकीचा अनुभव मिळावा यासाठी ही वाहने प्रगत अभियांत्रिकी प्रक्रियेतून विकसित केली आहेत. ग्राहकांनी त्यांच्या वाहनांच्या सर्वोत्तम कार्यक्षमतेसाठी मूळ उत्पादकांच्या (OEM) शिफारशीनुसार अधिकृत डीलरकडूनच वाहनाची नियमित देखभाल आणि सर्व्हिसिंग करून घ्यावी," असे आवाहन डॉ. रेजी मथाई यांनी केले आहे.
भारताच्या इथेनॉल मिश्रित इंधनाच्या ध्येयपूर्तीसाठी देशातील संपूर्ण वाहन उद्योग कटिबद्ध असून, ग्राहकांना कठोर चाचण्या पूर्ण करणारी सर्वोच्च गुणवत्तेचीच वाहने मिळतील, असा विश्वास पत्रकार परिषदेच्या समारोपात देण्यात आला.