अतिवृष्टीमुळे डोंगर खचला... पूर्ण गावच आले धोक्यात?

Share:
Main Image
Last updated: 05-Jul-2026

महाबळेश्वर, (प्रतिनिधी) ५ जुलै - सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावाच्या वरच्या बाजूचा काही भाग आज सकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे (मुसळधार पाऊस) खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दरड कोसळल्यासारख्या प्रकारात झाडांसह मोठा मलबा थेट रस्त्यावर वाहून आला असून तो हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही वृत्तवाहिन्यांवरून या संदर्भात भीतीदायक बातम्या प्रसारित झाल्यानंतर, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने वस्तुनिष्ठ माहिती जाहीर करत "नावली गावाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही," असे स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नावली गावाच्या वरच्या बाजूस असणारा जमिनीचा काही भाग झाडांसह खचून त्याचा मलबा खाली रस्त्यावर आला. विशेष म्हणजे ज्या बाजूला ही घटना घडली, तिथेच गावची पाण्याची टाकी आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासकीय यंत्रणा तात्काळ ॲक्शन मोडवर आली असून प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

पाण्याच्या टाकीची तातडीने तांत्रिक पाहणी

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या निर्देशानुसार, या खचलेल्या भागाच्या जवळ असलेल्या पाण्याच्या टाकीची 'सार्वजनिक बांधकाम विभाग' (PWD) आणि 'ग्रामीण पाणीपुरवठा विभागा'च्या अभियंत्यांकडून प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि टाकीला कोणताही धोका पोहोचू नये म्हणून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश या दोन्ही विभागांना देण्यात आले आहेत.

तीन कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर

Advertisement

ज्या ठिकाणी जमिनीचा भाग खचला आहे, त्या परिसराजवळ एकूण चार घरे आहेत. त्यापैकी एक घर पूर्णतः बंद आहे, तर उर्वरित तीन घरांमधील नागरिकांना प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या तिन्ही घरांतील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई; प्रशासनाचे आवाहन

"महाबळेश्वर आणि नावली गावातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून प्रशासकीय यंत्रणा २४ तास बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवरून गावाला धोका असल्याच्या कोणत्याही अफवा कोणीही पसरवू नयेत आणि नागरिकांनीही अशा अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये."

- जिल्हा प्रशासन, सातारा

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.