नाशिकसह या शहरांमध्ये सुरू होणार ही सुविधा... मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 05-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ५ जुलै - भविष्यातील जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या गेमिंग आणि डिजिटल कंटेंट क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. व्यापक 'एव्हीजीसी-एक्सआर' (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, या धोरणांतर्गत राज्यात ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे आणि दोन लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचा (Infrastructure) दर्जा देण्यात आला असून, याअंतर्गत ३,२६८ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यभरात १२ अत्याधुनिक 'एव्हीजीसी पार्क' विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 'ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६' च्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबईसह ६ शहरांत अत्याधुनिक रेंडरिंग सुविधा

डिजिटल कंटेंट निर्मितीला वेग देण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक 'व्हर्च्युअल प्रोडक्शन' व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित रेंडरिंग सुविधा उभारण्यात येणार आहेत. तसेच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ५० एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे 'कंटेंट क्रिएटर्स संकुल' (Content Creators Hub) उभारले जाईल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्मिती महाराष्ट्रात शक्य होईल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून मुंबईमध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज’ स्थापन होत असून, ही संस्था देशाच्या क्रिएटिव्ह आणि ऑरेंज इकॉनॉमीला (Orange Economy) नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

'इंडिया रायझिंग' ठरणार इतिहास; ग्रामीण युवकांना संधी

'ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६' संदर्भातील ‘इंडिया रायझिंग’ आणि ‘जिओ ब्लास्ट’ या उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील शहरांसह ग्रामीण भागातील प्रतिभावान युवा गेमर्सना जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याची समान संधी मिळणार आहे. या अभियानांतर्गत:

Advertisement

५० हजार स्पर्धक थेट सहभागी होणार.

५ हजार प्रत्यक्ष, तर ८ कोटी डिजिटल प्रेक्षक लाभणार.

जिओच्या ६० कोटींहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत या अभियानाची पोहोच होणार आहे.

...म्हणून गेमिंग आपल्याला 'नायक' बनवते!

"चित्रपट आपल्याला केवळ स्वप्नांचे जग दाखवतात; परंतु गेमिंग आपल्याला त्या स्वप्नांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि स्वतः त्या विश्वाचा 'नायक' बनण्याची संधी उपलब्ध करून देते. महाराष्ट्रातील युवा शक्ती, नवोन्मेष आणि सर्जनशीलतेच्या बळावर राज्य जागतिक गेमिंग आणि डिजिटल कंटेंट उद्योगाचे नेतृत्व करेल."

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.