मुंबई, (प्रतिनिधी) ५ जुलै - पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या प्रयोगानंतर आता केंद्र सरकारने डिझेलसाठीही एक विशेष योजना तयार केली आहे. जीवाश्म इंधनावरील (Fossil Fuel) अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊर्जा क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी डिझेलमध्ये १५ टक्क्यांपर्यंत 'आयसोब्युटेनॉल' मिसळण्याची योजना आखण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
सरकारच्या पर्यायी इंधन धोरणाची माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले, "इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळता येत नाही. त्यामुळे आम्ही इथेनॉलपासून आयसोब्युटेनॉल तयार करत आहोत, जो डिझेलसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. डिझेलमध्ये १५ टक्के आयसोब्युटेनॉल मिसळण्यास परवानगी देण्याच्या दिशेने सध्या सरकारचे काम सुरू आहे. याचे पायलट डेमोन्स्ट्रेशन (प्रायोगिक चाचणी) यशस्वी झाले असून त्याचे निष्कर्ष अतिशय उत्साहवर्धक आहेत. आम्ही १०० टक्के इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉलवर दोन जनरेटर यशस्वीपणे चालवून दाखवले आहेत, ज्यामुळे या इंधनांवर इंजिन चालू शकते हे सिद्ध झाले आहे."
...पण इथेनॉलमुळे ग्राहक त्रस्त!
एकीकडे सरकार पर्यावरणपूरक इंधनाचा दावा करत असले, तरी पेट्रोलमध्ये होत असलेल्या इथेनॉल मिश्रणामुळे देशभरातील कोट्यवधी वाहन चालक मेटाकुटीला आले आहेत. इथेनॉल मिश्रणानंतरही पेट्रोलचे दर कमी झालेले नाहीत; उलट वाहनांचे मायलेज लक्षणीयरीत्या घटले आहे. तसेच इंजिन वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक भुर्दंड आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डिझेलमधील संभाव्य मिश्रणाकडे आता वाहन क्षेत्र अत्यंत सावधगिरीने पाहत आहे.
काय आहेत 'आयसोब्युटेनॉल'चे फायदे?
पुढील पिढीचे बायोफ्यूल: आयसोब्युटेनॉल हे भविष्यातील एक प्रगत आणि उत्तम बायोफ्यूल मानले जाते.
अधिक घनता: याची घनता अधिक असल्याने ते इंजिनसोबत अधिक कार्यक्षमतेने काम करते.
प्रदूषणावर नियंत्रण: पारंपरिक इंधनांच्या तुलनेत आयसोब्युटेनॉलमुळे होणारे कार्बन उत्सर्जन अत्यंत कमी असते.
परकीय चलनाची होणार बचत
डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉलचे मिश्रण केल्यामुळे भारताची खनिज तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. आयातीवर होणारा अब्जावधी रुपयांचा खर्च घटल्यामुळे देशाचे परकीय चलन वाचेल आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.