हायवेवरील पुलाला भले मोठे तडे... वाहनधारकांची प्रचंड गैरसोय... महामार्ग प्राधिकरण म्हणते...

Share:
Main Image
Last updated: 04-Jul-2026

पालघर, (प्रतिनिधी) ४ जुलै - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (NH-48) विवळवेढे गावाजवळ असलेल्या महालक्ष्मी पुलावर निर्माण झालेल्या समस्येमुळे वाहनधारकांना झालेल्या त्रासाबद्दल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. प्राधिकरणाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत, प्रवाशांची सुरक्षा आणि सोयीसाठी त्वरित पावले उचलून अवघ्या काही तासांत दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार मान्सूनचा पाऊस आणि महामार्गावरील वाहनांची प्रचंड वर्दळ यामुळे महालक्ष्मी पुलाच्या रस्त्यावरील संरक्षक थराला (Wearing Coat) काही प्रमाणात तडे गेले होते. नियमित गस्तीदरम्यान हा प्रकार समोर येताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पुलाच्या वरील भागाला तडे गेले असले, तरी पुलाच्या मुख्य संरचनेला (Main Structure) कोणताही धोका निर्माण झालेला नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, मुंबई-अहमदाबाद पट्ट्यात अलीकडेच पूर्ण झालेल्या 'व्हाईट टॉपिंग' प्रकल्पांतर्गत या पुलावर कोणतेही काम करण्यात आले नव्हते. ९० च्या दशकात बांधण्यात आलेल्या या पुलाची महामंडळातर्फे नियमित देखभाल केली जाते.

तातडीने वाहतूक नियंत्रण आणि उपाययोजना

पुलावरील परिस्थिती लक्षात घेता, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एनएचएआयने तातडीने रस्त्याचा बाधित भाग बॅरिकेड्स (अडथळे) लावून बंद केला. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चोवीस तास वाहतूक नियंत्रक (ट्रॅफिक मार्शल) तैनात करण्यात आले होते. वाहनधारकांना पूर्वकल्पना मिळण्यासाठी धोक्याची सूचना देणारे फलक, ब्लिंकर्स आणि वाहतूक सुरक्षेची आधुनिक साधने लावून वाहतुकीचे योग्य नियमन करण्यात आले.

Advertisement

दुपारी ३ वाजेपर्यंत काम फत्ते!

या पुलावरील दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य देत एनएचएआयने तात्काळ यंत्रणा कामाला लावली. ३ जुलै, २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत खराब झालेल्या रस्त्याची तातडीची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून, हा रस्ता आता पुन्हा वाहतुकीयोग्य करण्यात आला आहे. आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या चाचण्या (Testing) घेतल्यानंतर, दुरुस्त केलेला हा भाग लवकरच वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला जाणार आहे.

कायमस्वरूपी दुरुस्ती करणार: एनएचएआय

"महालक्ष्मी पुलावरील परिस्थितीवर आमचे अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून आहेत. सध्या तात्पुरती दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित केला असला, तरी पावसाचा जोर ओसरून हवामान अनुकूल होताच या ठिकाणी कायमस्वरूपी सुधारणा करण्याचे काम हाती घेतले जाईल. पावसाळ्याच्या दिवसांत सर्व वाहनधारकांसाठी सुरक्षित, सुरळीत आणि अखंडित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी प्राधिकरण कटिबद्ध आहे."

- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)

Advertisement

Comments

No comments yet.