जळगाव, (प्रतिनिधी) ४ जुलै - नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या जळगाव जिल्हा दौऱ्यादरम्यान रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम 'लालमाती' परिसराला भेट दिली. येथील शासकीय आदिवासी प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेची पाहणी केल्यानंतर त्यांनी आयोजित 'विशेष संवाद' कार्यक्रमात आदिवासी नागरिकांशी थेट चर्चा करून त्यांच्या प्रलंबित समस्या जाणून घेतल्या आणि त्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आश्रमशाळेतील डिजिटल शिक्षणाचे कौतुक
विभागीय आयुक्तांनी लालमाती येथील निवासी आश्रमशाळेतील डिजिटल क्लासरूम, सुसज्ज अभ्यासिका आणि वर्गखोल्यांच्या नियोजनाची सविस्तर पाहणी केली. आश्रमशाळेत आधुनिक शिक्षण प्रणालीचा होत असलेला प्रभावी वापर पाहून त्यांनी तीव्र समाधान व्यक्त केले.
शाळा आणि ग्रामपंचायतीबाबत मोठे निर्णय
दुर्गम भागातील शैक्षणिक व प्रशासकीय सोयीसाठी डॉ. गेडाम यांनी दोन महत्त्वाचे निर्देश दिले:
१. सहस्त्रलिंग गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा.
२. लालमाती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी तात्काळ मंजुरी द्यावी.
ग्रामस्थांनी मांडला समस्यांचा पाढा
संवाद कार्यक्रमादरम्यान आदिवासी महिला व ग्रामस्थांनी सहस्त्रलिंग पाझर तलावाची दुरुस्ती, आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था, रानडुकरांकडून पिकांचे होणारे नुकसान आणि त्यासाठी संरक्षण कुंपणाची गरज यांकडे लक्ष वेधले. याशिवाय रस्ते, गटारी, ग्रामपंचायत कार्यालय आणि शाळेतील शिक्षकांची कमतरता या समस्याही मांडल्या. यावर आयुक्तांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
सावखेडा येथे घरकुलांची गुणवत्ता तपासली
यापूर्वी विभागीय आयुक्तांनी रावेर तालुक्यातीलच सावखेडा बु. येथील घरकुल कॉलनीला भेट दिली. घरकुलांच्या बांधकामाची गुणवत्ता स्वतः तपासत त्यांनी लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पात्र नागरिकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना वेळेत पोहोचवण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी ग्रामस्थांनी सावखेडा-लोहारा रस्त्यावरील पुलांची उभारणी, शेतरस्ते, जलजीवन मिशनची कामे आणि वाचनालयाची मागणी आयुक्तांकडे केली.
उपस्थिती:
या दौऱ्याप्रसंगी डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, परिवेक्षाधीन उपजिल्हाधिकारी दीपा जेधे, गटविकास अधिकारी विनोद मेढे, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्यासह सावखेडा बु. चे सरपंच युवराज कराड, सावखेडा खु. चे सरपंच रवींद्र बखाल आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.