मुंबई, (प्रतिनिधी) ४ जुलै - हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस कंपनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे 'ग्रीनफिल्ड' प्रकल्पासह महाराष्ट्रात सुमारे १,२०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. या मेगा प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून, स्थानिक उद्योगांना चालना मिळण्यासोबतच परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानभवन येथे जामनेर (जि. जळगाव) येथील कोका-कोला प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते. तसेच हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हेमंत रुपाणी, उपाध्यक्ष हिमांशू प्रियदर्शी आणि मुख्य एकात्मिक पुरवठा साखळी अधिकारी अविनाश कांत कुमार आदी वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
"गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सक्षम स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यावरणपूरक विकास आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लावणाऱ्या उद्योगांचे महाराष्ट्र नेहमीच स्वागत करतो."
— देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
४६ लाख नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल
हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत रुपाणी यांनी कंपनीच्या वाटचालीबद्दल सांगितले की, "महाराष्ट्रातील सध्याच्या तीन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून कंपनीने विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागांत रोजगारनिर्मितीला मोठी चालना दिली आहे. स्थानिक पुरवठा साखळी अधिक मजबूत करतानाच, विविध सामाजिक विकास उपक्रमांद्वारे राज्यातील सुमारे ४६ लाख नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवून आणण्यात कंपनीला यश आले आहे."