मुंबई, (प्रतिनिधीP) ४ जुलै - पुणे शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. शहरात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीजवाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्रे (Substations) उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला असून, ही सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली. पुणे शहरातील वीज समस्येबाबत आमदार भिमराव तापकीर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री बोलत होत्या. या चर्चेत आमदार नितेश राणे, चेतन तुपे, नाना पटोले, हेमंत रासने आणि सिद्धार्थ शिरोळे यांनीही सहभाग घेऊन पुण्याच्या वीज प्रश्नांकडे लक्ष वेधले.
धोकादायक वाहिन्यांचे भूमिगतकरण व 'डीपी' सुरक्षित करणार
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, पुण्यात नवीन उपकेंद्रे उभारणे, उघड्यावर असलेल्या धोकादायक २२ केव्ही वीजवाहिन्यांचे भूमिगतकरण करणे आणि वितरण केंद्रे (डीपी) सुरक्षित करणे या कामांना प्राधान्य दिले जात आहे. पु. ल. देशपांडे उद्यान ते धनकवडी, सहकारनगर आणि पंचवटी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने या भागात भूमिगत दुहेरी वीजवाहिन्या (Underground Double Circuit Lines) प्रस्तावित करण्यात आल्या असून ही कामे लवकरच पूर्ण केली जातील.
बालेवाडी आणि वाढवण येथे नवीन उपकेंद्रे
बालेवाडी प्रकल्प: बालेवाडी येथील २२० केव्ही अति उच्चदाब उपकेंद्रासाठी आवश्यक जमीन महापारेषणला उपलब्ध करून देण्यात आली असून सुधारित डीपीआरलाही (DPR) मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल.
वाढवण प्रकल्प: वाढवण उपकेंद्रासाठी आवश्यक जमीन हस्तांतराबाबतही सकारात्मक कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
टाउन डीपीआर: या अंतर्गत दोन नवीन उपकेंद्रे आणि नऊ नवीन स्विचिंग स्टेशन मंजूर करण्यात आली असून, यामुळे पुण्यातील भावी वीजटंचाई टळणार आहे.
देखभाल-दुरुस्तीसाठी १३० कोटींचा निधी; हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!
पुण्यातील धोकादायक वितरण केंद्रांच्या (डीपी) तातडीच्या दुरुस्तीसाठी १३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्ती करण्याचे कडक आदेश देण्यात आले असून, कामात दिरंगाई किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही राज्यमंत्र्यांनी दिला. तसेच कात्रज ते नवले पूल आणि चांदणी चौक ते नवले पूल या मार्गावरील धोकादायक २२ केव्ही वीजवाहिन्या व ट्रान्सफॉर्मर सुरक्षित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
"स्मार्ट मीटरबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका!"
"स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज आहेत. मात्र, या मीटरमुळे दिवसा वीज वापरल्यास वीजबिल तुलनेने कमी येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती समजून घ्यावी."
— मेघना साकोरे-बोर्डीकर, ऊर्जा राज्यमंत्री