नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३ जुलै - देशामधील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे अधिक मजबूत, दीर्घकाळ टिकणारे आणि सुरक्षित करण्यासाठी 'भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा'ने (NHAI) एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर बांधल्या जाणाऱ्या नव्या आणि महत्त्वाच्या पुलांची गुणवत्ता, संरचना व अभियांत्रिकी डिझाईन तपासण्यासाठी एनएचएआय आता देशातील नामवंत 'भारतीय तंत्रज्ञान संस्था' (IIT) आणि इतर आघाडीच्या तंत्रज्ञान संस्थांची मदत घेणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सहभागी होण्यासाठी आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी रुरकी, आयआयटी खरगपूर यांच्यासह देशातील सुमारे १२ आघाडीच्या संस्थांनी एनएचएआयसोबत एकत्रित काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
१०० वर्षे टिकणाऱ्या पुलांसाठी 'थ्री-लेयर' तपासणी
या उपक्रमाचा मुख्य उद्देश, १०० वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक आयुर्मान असलेल्या महत्त्वाच्या पुलांची बांधणी करताना प्रत्येक टप्प्यावर त्यांची कठोर आणि स्वतंत्र तपासणी केली जावी हा आहे. या अंतर्गत आयआयटीचे तज्ज्ञ आणि नामांकित संस्था पुलांच्या बांधकामापूर्वी स्वतंत्र जलवैज्ञानिक (Hydrological) अभ्यास आणि संरचनात्मक तपासणी करणार आहेत.
एकसमान देशव्यापी संस्थात्मक आराखडा
या भागीदारीमुळे एनएचएआयला महत्त्वाच्या पूल प्रकल्पांच्या रचना पडताळणीसाठी एक देशव्यापी संस्थात्मक आराखडा (Framework) विकसित करता येणार आहे. हा आराखडा देशातील सर्व प्रकल्पांना एकसमान पद्धतीने लागू केला जाईल. यामुळे विविध भौगोलिक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमध्ये गुणवत्ता हमीच्या प्रक्रियांना अधिक बळकटी मिळेल आणि बांधकामाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.
'या' तांत्रिक बाबींचे होणार सखोल परीक्षण
या उपक्रमांतर्गत आयआयटीच्या तज्ज्ञांमार्फत खालील बाबींचे काटेकोर परीक्षण केले जाईल:
संरचनात्मक रचनेचे मोजमाप आणि अभियांत्रिकी आराखडे (Engineering Designs).
बांधकामाची प्रत्यक्ष कार्यपद्धती आणि तंत्रज्ञान.
भू-तांत्रिक तपासण्या (Geotechnical Investigations).
जलवैज्ञानिक अभ्यास आणि पाण्याचा प्रवाहाचा होणारा परिणाम.
भविष्यातील धोके टळणार
या उपक्रमामुळे महामार्गावरील पुलांची संरचनात्मक सुरक्षितता कमालीची वाढणार असून, बांधकामाची विश्वासार्हता अधिक बळकट होईल. तसेच, भविष्यात पुलांना निर्माण होणारा दीर्घकालीन कार्यात्मक धोका (Functional Risk) पूर्णपणे कमी होईल. भविष्यातील गरजांसाठी सक्षम आणि उच्च दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग जाळे विकसित करण्याच्या एनएचएआयच्या उद्दिष्टाला या तांत्रिक भागीदारीमुळे मोठा बूस्टर डोस मिळणार आहे.