विद्यार्थ्यांसाठी राज्यातील ७ शहरात वसतिगृह... तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे विशेष अभियान... मुंबईतील बैठकीत महत्त्वाचे निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 05-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३ जुलै - जैन समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांसह राज्यातील एकूण सात महत्त्वाच्या ठिकाणी भव्य वसतिगृहे (Hostels) उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत समाजातील तरुण, महिला आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कर्ज व व्याज परतावा योजनांच्या सुधारित प्रारूपास मान्यता

महामंडळामार्फत जैन समाजातील नवउद्योजक आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज व व्याज परतावा योजनांच्या सुधारित प्रारूपास या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच, धार्मिक आणि सामाजिक स्तरावर महत्त्वाच्या असलेल्या ‘विहारधाम निर्माण योजना’ आणि ‘पाठशाळा आधुनिकीकरण व सक्षमीकरण योजना’ राज्यभरात प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

१०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध; अध्यक्षांचे अभिनंदन

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळाकडून (NMDFC) १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या या सामंजस्य करारासाठी (MoU) महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी विशेष पाठपुरावा केला होता. या यशाबद्दल महामंडळाचे समन्वयक संदीप भंडारी यांनी बैठकीत अध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, ज्याला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी देऊन ललित गांधी यांच्या कार्याचे कौतुक केले.

युवकांसाठी कौशल्य विकास आणि 'मराठी जैन साहित्य विश्वकोष'

Advertisement

बैठकीत घेतलेले इतर काही महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे आहेत:

कौशल्याधारित विशेष अभियान: कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने जैन समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' आणि इतर रोजगाराभिमुख योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल.

महिला बचत गटांना बळ: महिला व बाल विकास विभागाच्या मदतीने समाजातील महिला बचत गटांसाठीच्या शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यावर चर्चा झाली.

साहित्याचा ठेवा: जैन संस्कृती आणि साहित्याचा इतिहास जतन करण्यासाठी ‘मराठी जैन साहित्य विश्वकोष’ निर्मितीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

नवी दिल्लीत विशेष बैठक: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महामंडळाच्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आणि प्रमुख व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच नवी दिल्ली येथे एक विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे.

बैठकीला प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव माधवी खोडे-चवरे, व्यवस्थापकीय संचालक मेघना शिंदे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दोंदे, वित्त विभागाच्या कार्यासन अधिकारी रचना तळेकर, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी उपस्थित होते. तसेच महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी, विकास अच्छा, अमित जैन, दर्शना जैन, विश्वजीत कोल्हापुरे आणि प्रशांत गौडाजे उपस्थित होते.

Advertisement

Comments

No comments yet.