इयत्ता चौथी गणिताच्या पुस्तकात गंभीर चुका... अखेर बालभारतीकडून ही घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 02-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) २ जुलै - इयत्ता चौथीच्या गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकात झालेल्या काही गंभीर मुद्रणदोषांची (Printing Mistakes) अखेर पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) दखल घेतली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये या त्रुटींबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर, बालभारतीने या चुका मान्य केल्या असून पुढील आवृत्तीत यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, सद्यस्थितीत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गोंधळ उडू नये, यासाठी सुधारित बदलांचा एक व्हिडीओ तातडीने पुस्तकातील क्युआर कोडवर (QR Code) उपलब्ध करून दिला जाणार आहे. इयत्ता चौथीचे गणित पाठ्यपुस्तक एकूण १० माध्यमांमध्ये प्रकाशित केले जाते. त्यापैकी केवळ मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात खालील मुद्रणदोष निदर्शनास आले आहेत:

१. गणिततज्ज्ञ रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकली!

मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक १०९ वर थोर भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकीची छापली गेली आहे. पुस्तकात ही तारीख '२७ एप्रिल १९२०' अशी आली आहे, मात्र त्यांची योग्य निधनाची तारीख '२६ एप्रिल १९२०' अशी आहे. ही मोठी चूक पुढील आवृत्तीत सुधारली जाईल.

२. मराठी माध्यमात 'ग्रॅम' की 'किलोग्रॅम'?

Advertisement

मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक ५५ वरील स्वाध्यायामध्ये (प्रश्न क्र. १ - जोड्या लावा) एक तांत्रिक चूक झाली आहे. तिथे '१००० ग्रॅमपेक्षा जास्त' असा मजकूर छापला गेला आहे. वास्तविक पाहता, तिथे '१००० किलोग्रॅमपेक्षा जास्त' असा शब्द असणे अपेक्षित होते. ही चूक केवळ मराठी माध्यमाच्या पुस्तकातच झाली आहे.

३. इंग्रजी माध्यमात रुपयांचा घोळ!

इंग्रजी माध्यमाच्या गणिताच्या पुस्तकात पृष्ठ क्रमांक ७७ वर चलनी पाउंड आणि रुपयांच्या संदर्भात छपाईचा दोष झाला आहे. या पानावरील खालून चौथ्या ओळीत 'of' ऐवजी 'of ₹1' असे असायला हवे होते. तसेच, खालून तिसऱ्या ओळीत '₹1.49 rupees' असा अशुद्ध उल्लेख झाला आहे, त्याऐवजी केवळ '49 rupees' असे असणे अपेक्षित होते.

क्युआर कोड ठरणार मदतीचा!

या मुद्रणदोषांमुळे शाळांमध्ये अध्यापन करताना शिक्षक किंवा अभ्यास करताना विद्यार्थी संभ्रमात पडू नयेत, यासाठी बालभारतीच्या संबंधित विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. या सर्व सुधारित बदलांची अचूक माहिती देणारा एक विशेष व्हिडीओ तयार करण्यात येत असून, तो पाठ्यपुस्तकात दिलेल्या QR Code वर तातडीने अपलोड केला जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांना वर्गात योग्य माहिती शिकवणे सोपे होणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.