त्र्यंबकेश्वर मंदिर 'व्हीआयपी' दर्शनाचा मुद्दा विधिमंडळात गाजला... अखेर सरकारने घेतला हा कठोर निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 02-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २ जुलै - नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी (VIP) दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक व भाविक यांच्यात झालेल्या वादाच्या प्रकरणाची प्रशासनामार्फत सखोल चौकशी सुरू आहे. या चौकशी अहवालानुसार जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर नियमानुसार अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य सुनील शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरातील गैरप्रकारांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर झालेल्या चर्चेत सदस्य भावना गवळी, प्रविण दरेकर आणि किशोर दराडे यांनीही उपप्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याला उत्तर देताना राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

भाविकांना सन्मानाची वागणूक देण्याचे निर्देश

त्र्यंबकेश्वर हे देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने मंदिर परिसरात भाविकांशी अत्यंत सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्याचे कडक निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत, असे राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले. सुरक्षा रक्षक आणि भाविक यांच्यात वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे.

दर्शन व्यवस्थेत सुसूत्रता; दररोज ९ हजार भाविकांना दर्शन

भाविकांची गर्दी लक्षात घेता आणि त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. सध्या मंदिरात खालीलप्रमाणे दर्शनाची सोय उपलब्ध आहे:

Advertisement

ऑनलाइन दर्शन: डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून दररोज सुमारे २ हजार भाविकांना ऑनलाइन पासेसद्वारे दर्शनाची सुविधा दिली जात आहे.

ऑफलाइन दर्शन: थेट मंदिरात येणाऱ्या सुमारे ७ हजार भाविकांना रोज ऑफलाइन व्यवस्थेद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तातडीचे दर्शन: ज्या भाविकांना तातडीने दर्शन हवे आहे, त्यांच्यासाठी निर्धारित शुल्क आकारून 'विशेष पास'ची (Paid VIP Pass) सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

पारदर्शकतेवर भर

मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचा वशिला किंवा गैरप्रकार चालणार नाही. संपूर्ण दर्शन व्यवस्था शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यासोबतच दूरवरून येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी स्थानिक प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टमार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असेही राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सभागृहात स्पष्ट केले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.