अमळनेर, (प्रतिनिधी) २ जुलै - संपूर्ण महाराष्ट्रात 'प्रति पंढरपूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमळनेर येथील ऐतिहासिक संत सखाराम महाराज वाडी संस्थानात मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावरील हभप प्रसाद महाराज यांच्या बैठक खोलीसह मंदिराच्या पुरातन लाकडी बांधकामाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, मुख्य मंदिरातील देवमूर्ती सुरक्षित राहिल्याने लाखो भाविकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
क्षणार्धात पसरली आग
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळीच गादीप्रमुक हभप प्रसाद महाराज संत सखाराम महाराजांची पायी दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले होते. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेजवळ अचानक शॉर्टसर्किट झाले आणि ठिणग्या उडून आग लागली. वाडी संस्थानाचे संपूर्ण मंदिर पुरातन लाकडी बांधकामाचे असून, त्याला दरवर्षी ऑइल पेंट करण्यात येत असल्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले आणि धुराचे लोट गगनाला भिडले.
पाच तालुक्यांतून अग्निशमन बंब दाखल; नदीकाठचे रस्ते ठरले देवदूत
घटनेची माहिती मिळताच अमळनेर आणि पारोळा नगरपालिकेचे अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आगीचे भीषण स्वरूप पाहून आमदार अनिल पाटील यांनी तातडीने सूत्रे हलवून चोपडा, शिरपूर आणि धरणगाव येथून अतिरिक्त अग्निशमन बंब मागविण्याची व्यवस्था केली.
या कठीण प्रसंगात माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या दूरदृष्टीची चर्चा नागरिकांमध्ये होती. त्यांनी पूर्वी बोरी नदीच्या दोन्ही काठांवर रुंद रस्ते विकसित केले होते. याच रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना थेट मंदिरामागे घटनास्थळी वेळेत पोहोचणे शक्य झाले. अन्यथा सराफ बाजारातील अत्यंत अरुंद गल्ल्यांमधून अग्निशमन वाहने नेणे अशक्य झाले असते आणि मोठी हानी झाली असती, अशी प्रतिक्रिया अमळनेरकरांनी व्यक्त केली.
"आधी पांडुरंग!" आगीची वार्ता ऐकूनही दिंडी कायम
संस्थान पेटल्याची आणि राहती खोली जळाल्याची हृदयद्रावक माहिती पंढरपूर मार्गावर असलेल्या हभप प्रसाद महाराज यांना मिळाली. मात्र, अशाही परिस्थितीत त्यांनी "आधी पांडुरंग" ही विठ्ठल चरणाची आर्त भावना जपत पंढरपूरची दिंडी अर्धवट सोडली नाही आणि माघारी न फिरण्याचा बाणेदार निर्णय घेतला. त्यांच्या या विठ्ठलभक्तीची आणि भूमिकेची संपूर्ण जिल्ह्यात कौतुकास्पद चर्चा होत आहे.
अमळनेरमध्ये दिसले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
आग लागल्याचे समजताच जात-पात, धर्म बाजूला ठेवून परिसरातील हजारो नागरिक, स्वयंसेवक धावून आले. खाजगी टँकरधारक व विविध संस्थांनी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले. आग विझविण्याच्या कार्यात नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांसह हिंदू आणि मुस्लिम समाजातील शेकडो नागरिकांनी खांद्याला खांदा लावून आग आटोक्यात आणली. अमळनेरच्या मातीने या संकटसमयी सामाजिक सलोखा आणि अभेद्य ऐक्याचे दर्शन अवघ्या महाराष्ट्राला घडवले.
स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंदिर बंद
आगीच्या दुर्घटनेनंतर प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी रात्रीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आगीमुळे मंदिराच्या लाकडी वास्तूचे नुकसान झाले असल्याने, इमारतीचे संपूर्ण 'स्ट्रक्चरल ऑडिट' पूर्ण होईपर्यंत संत सखाराम महाराज वाडी संस्थान भाविकांच्या दर्शनासाठी काही दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दिली.
संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्कात
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असून, आग आटोक्यात आणण्यासाठी जवळील तालुक्यांमधून अतिरिक्त अग्निशामक दलाचे बंब मागविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून, अग्निशामक दल आणि प्रशासनाकडून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संबंधित यंत्रणांच्या सतत संपर्कात असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
- खासदार स्मिता वाघ, जळगाव,लोकसभा