'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची'... ४०० ठिकाणांवर ३ हजार लिटर तेलाने वारकऱ्यांचा थकवा होणार दूर...

Share:
Main Image
Last updated: 01-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधीP) १ जुलै - आषाढी वारीच्या निमित्ताने विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुखाचा आणि आरोग्याचा विचार करत, 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षा'तर्फे या वर्षीही पालखी मार्गावर 'चरण सेवा' उपक्रम अत्यंत व्यापक स्वरूपात सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमांतर्गत ११ प्रमुख जिल्ह्यांमधील पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार आणि मोफत मालिश सेवेला प्रारंभ झाला आहे.

११ जिल्ह्यांतील ४०० मुक्काम स्थळांवर सेवा

यंदा या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, वारकऱ्यांचा पायी प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या उपक्रमात सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या ११ प्रमुख जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पालखी मार्गावरील सुमारे ४०० विश्रांती व मुक्काम स्थळांवर ही सेवा २४ तास उपलब्ध असणार आहे.

१२ हजार प्रशिक्षित वैद्यकीय दूत सेवेसाठी सज्ज

वारकऱ्यांच्या सेवेसाठी यंदा तब्बल १२ हजारांहून अधिक प्रशिक्षित डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय व फिजिओथेरपीचे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. जिल्हा प्रशासन, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि विविध सेवाभावी संस्थांच्या समन्वयातून हा महायज्ञ राबवला जात आहे.

३ हजार लिटर आयुर्वेदिक तेलाने थकलेल्या पायांना दिलासा

Advertisement

वारीदरम्यान दररोज अनेक किलोमीटर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायांवर मोठा ताण येतो. पायांना सूज येणे, फोड येणे, स्नायू ताणले जाणे आणि थकवा यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ३ हजार लिटर आयुर्वेदिक तेलाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशिक्षित वैद्यकीय पथके आधुनिक मसाज उपकरणांच्या आणि आयुर्वेदिक तेलाच्या साहाय्याने वारकऱ्यांच्या पायांची मालिश करून त्यांचा थकवा दूर करत आहेत. तसेच तातडीच्या मदतीसाठी पालखी मार्गावर रुग्णवाहिका सेवाही हायअलर्टवर ठेवण्यात आली आहे.

८ आरोग्य रथांद्वारे जनजागृती आणि 'योगसत्रे'

केवळ उपचारच नाही तर वारकऱ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी ८ विशेष आरोग्य जनजागृती रथ पालखी सोबतीला धावत आहेत. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती, स्वच्छतेचे महत्त्व आणि पावसाळ्यातील आजारांपासून बचावाचे मार्गदर्शन केले जात आहे. याशिवाय, वारकऱ्यांच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी निवडक ठिकाणी 'योगसत्रांचे'ही आयोजन करण्यात आले आहे.

 गतवर्षी पावणेदोन लाख वारकऱ्यांनी घेतला लाभ!

गेल्या वर्षी या उपक्रमाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. सुमारे १ लाख ७५ हजार वारकऱ्यांनी थेट चरण सेवा व वैद्यकीय उपचारांचा लाभ घेतला होता, तर १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्याचा संदेश पोहोचवला गेला होता. यावर्षी हा आकडा आणखी वाढवण्याचे नियोजन आहे.

"तुज मागणें तें देवा, आम्हां तुझी चरण सेवा..."

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील सेवाभावातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. "वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सुविधांची जोड देणारा हा एक संवेदनशील उपक्रम आहे. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून यंदा ही चरण सेवा अधिक व्यापक स्वरूपात वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास आमची यंत्रणा सज्ज आहे," अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. सर्व दिंडी प्रमुख आणि वारकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.