'आधी लाच द्या, मगच घरकुलाचा हप्ता घ्या'... ग्रामविकास अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 01-Jul-2026

राहुरी, (प्रतिनिधी) १ जुलै - प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या बांधकामाचा पुढील हप्ता मंजूर करण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुरी तालुक्यातील सात्रळ ग्रामपंचायतीच्या कंत्राटी लिपिकाला आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्या गृहनिर्माण अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यासह तिघांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईत खालील तीन लोकसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे:

१) हैदर याकुब पटेल (वय ५६): ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सात्रळ, ता. राहुरी.

२) ज्ञानदेव मोहन डुकरे (वय ४३): लिपिक (कंत्राटी), ग्रामपंचायत सात्रळ, ता. राहुरी.

३) सचिन होशीराम ब्राम्हणे: गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी), पंचायत समिती राहुरी.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार सन २०२३ मध्ये त्यांना घरकुल मंजूर झाले. घरकुलाच्या बांधकामाच्या अनुदानाचा पहिला हप्ता १५,०००/- रुपये व दुसरा हप्ता ७०,०००/- रुपये त्यांना प्राप्त झाला होता. त्यानंतर घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अनुदानाचा पुढील ७०,०००/- रुपयांचा हप्ता मंजूर करण्याच्या प्रक्रियेत मदत केल्याच्या मोबदल्यात आणि पुढील हप्ते मंजूर करण्यासाठी आरोपी लोकसेवकांनी तक्रारदाराकडे २०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने २९ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार नोंदवली होती.

पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ३० जून २०२६ रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल व कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे यांची भेट घेतली असता, त्यांनी घरकुल अनुदानाचा पुढील हप्ता मंजूर करण्यासाठी २०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

Advertisement

एसीबीचा यशस्वी सापळा

पडताळणी झाल्यानंतर ३० जून २०२६ रोजीच अहिल्यानगर एसीबीच्या पथकाने राहुरी येथे सापळा रचला. या नियोजित सापळा कारवाई दरम्यान कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे याने तक्रारदाराकडून २०,०००/- रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली, तर कंत्राटी गृहनिर्माण अभियंता सचिन ब्राम्हणे याने आरोपी डुकरे याला लाच रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.

एसीबीची टीम व मार्गदर्शन

ही धडक कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर अहिल्यानगर एसीबीचे पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती सविता तांबे आणि सापळा पथकातील अंमलदार राजू आव्हाड, चंद्रकांत काळे, किशोर कुलधर, शेखर वाघ आणि चालक दशरथ लाड यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे करत आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन:

शासकीय कामासाठी किंवा कोणत्याही हक्काच्या कामासाठी शासकीय अधिकारी/कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा.

टोल फ्री क्रमांक: १०६४

अहिल्यानगर एसीबी व्हॉट्सॲप क्रमांक: ९१६८६५१०६४

दूरध्वनी क्रमांक: ०२४१-०२४२३६७७

Advertisement

Comments

No comments yet.