मुंबई, (प्रतिनिधी) ३० जून - नोकरीच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये तक्रार करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांची ओळख आता पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी अत्यंत महत्त्वपूर्ण ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचने दरम्यान तरुणांच्या सुरक्षेचा आणि फसवणुकीचा हा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला.
केवळ तक्रार मागे घेतली म्हणून गुन्हेगार सुटणार नाहीत!
लक्षवेधी मांडताना आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्यातील वाढत्या बेरोजगारीवर आणि फसवणुकीच्या गंभीर विळख्यावर बोट ठेवले. "आजच्या घडीला बेरोजगारीमुळे अनेक तरुण कर्ज काढून किंवा घरचे दागिने गहाण ठेवून नोकरीसाठी पैसे देतात. मात्र, फसवणूक झाल्यानंतर आरोपींकडून मिळणाऱ्या धमक्या, दबाव किंवा कालांतराने काही पैसे परत मिळाल्यामुळे निर्माण होणाऱ्या भीतीपोटी अनेक युवक आपल्या तक्रारी मागे घेतात. यामुळे मूळ गुन्हा आणि गुन्हेगार संपत नाही. केवळ तक्रार मागे घेतली म्हणून प्रकरण संपुष्टात आले, असे गृहीत धरता येणार नाही. अशा फसवणूक झालेल्या तरुणांना सुरक्षित वातावरण मिळणे अत्यंत गरजेचे आहे," असे तांबे यांनी ठामपणे सभागृहात मांडले.
यासोबतच, नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या अशा रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी राज्यभरातील गुन्ह्यांची माहिती एकत्रित करून स्वतंत्र चौकशी करावी आणि युवकांसाठी एक विशेष स्वतंत्र 'हेल्पलाईन' सुरू करावी, अशी आग्रही मागणीही आमदार तांबे यांनी केली.
सर्व यंत्रणांकडून माहिती मागवून चौकशी करणार: गृहराज्यमंत्री
आमदार सत्यजीत तांबे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. "राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांकडून नोकरीच्या फसवणुकीबाबतच्या गुन्ह्यांची सविस्तर माहिती मागवून घेतली जाईल आणि या रॅकेटची सखोल चौकशी केली जाईल," असे त्यांनी सांगितले.
तसेच, पोलिसांच्या विद्यमान हेल्पलाईनवर अशा फसवणुकीची तक्रार नोंदविणाऱ्या कोणत्याही युवकाची ओळख किंवा नाव जाहीर केले जाणार नाही; ते पूर्णपणे 'गोपनीय' ठेवले जाईल, जेणेकरून गुन्हेगारांकडून तक्रारदारांवर कोणताही दबाव आणला जाऊ शकणार नाही, असे आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिले. सरकारच्या या निर्णयामुळे फसवणूक झालेल्या हजारो तरुणांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.