मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’... अशी असतील त्याची वैशिष्ट्ये...

Share:
Main Image
Last updated: 30-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३० जून - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मनमाडच्या ऐतिहासिक भूमीत त्यांच्या विचारांचे जतन आणि समाज परिवर्तनाच्या कार्याला प्रेरणा देणारी भव्य ‘भीमसृष्टी’ उभारण्यासाठी शासन सकारात्मक असून, हा प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मनमाड येथील भीमसृष्टी उभारण्यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्री संजय ‍शिरसाट यांच्या शासकीय निवासस्थानी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रकल्पाच्या विविध पैलूंवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी नांदगावचे आमदार सुहास कांदे, विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सहसचिव सोमनाथ बागुल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले, मनमाड ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून, त्यांच्या असंख्य आठवणी या ठिकाणी आहेत. त्या जपण्यासाठी तसेच बाबासाहेबांच्या विचारांचा आणि समाज परिवर्तनातील त्यांच्या महान कार्याचा गौरव करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, ‘भीमसृष्टी’ प्रकल्पाच्या उभारणीबाबत शासनाची भूमिका सकारात्मक आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी असलेला ऐतिहासिक आणि वैचारिक संबंध लक्षात घेऊन येथे भव्य ‘भीमसृष्टी’ उभारण्याची संकल्पना साकारण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेची मूल्ये पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

प्रस्तावित प्रकल्पामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, प्रेरणादायी स्मारक, भगवान गौतम बुद्ध स्मारक, अत्याधुनिक विपश्यना केंद्र, सभागृह, लँडस्केपिंग, पार्किंग तसेच नागरिकांसाठी विविध सुविधा उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बैठकीत प्रकल्पासाठी आवश्यक जागा, प्रशासकीय प्रक्रिया, निधी उपलब्धता आणि प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर आढावा घेण्यात आला. हा प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश मंत्री शिरसाट यांनी यावेळी दिले.

मनमाड नगर परिषद, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून हा प्रकल्प साकारल्यास मनमाड हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रेरणास्थान म्हणून विकसित होईल. तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्यातील एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येईल, असेही मंत्री शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.