वडोदरा ते मुंबई अवघ्या ४ तासांत... दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे या तारखेला खुला होणार... मुख्यमंत्र्यांची घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 29-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २९ जून - देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेला दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग (वडोदरा-मुंबई विभाग) आगामी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्याचे नियोजन आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. या द्रुतगती मार्गामुळे वडोदरा ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी आठ तासांवरून थेट चार तासांवर येणार असून, व्यावसायिक मालवाहतुकीसह प्रवाशांना वेगवान आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर जिल्हा दौऱ्यादरम्यान वडोदरा-मुंबई विभागाच्या सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दौऱ्याप्रसंगी त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्प दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे आणि कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश दिले.

पाच राज्यांना जोडणारा ८ पदरी आधुनिक मार्ग

भारत सरकारमार्फत सुमारे १ लाख कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा हा ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड द्रुतगती मार्ग सुमारे १,४०० किलोमीटर लांबीचा आणि ८ पदरी आहे. हा मार्ग हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या देशातील प्रमुख पाच राज्यांना एकमेकांशी जोडणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांच्यातील संपर्क अधिक सक्षम आणि वेगवान होणार आहे.

महाराष्ट्रातील १५७ किमीचा टप्पा अंतिम टप्प्यात

या महामार्गाचा महाराष्ट्रातील वडोदरा-मुंबई विभाग सुमारे १५७ किलोमीटर लांबीचा असून, यासाठी सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. एकूण सात बांधकाम पॅकेजमध्ये या विभागाचे काम विभागण्यात आले असून, त्यापैकी पाच पॅकेजचे काम पूर्ण झाले असून ते वाहतुकीसाठी सज्ज आहेत. उर्वरित दोन पॅकेजचे काम ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण होणार असून ३१ ऑगस्ट २०२६ रोजी हा मार्ग सर्वसामान्य आणि व्यावसायिक वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

'जेएनपीए' थेट जोडणीमुळे लॉजिस्टिक साखळीला बळकटी

Advertisement

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाशी (JNPA) झालेली थेट जोडणी होय. यामुळे उत्तर भारतातून जेएनपीए बंदरापर्यंत होणारी मालवाहतूक अधिक जलद, कार्यक्षम आणि अत्यंत कमी खर्चात होईल. सध्या ठाणे, भिवंडी आणि घोडबंदर मार्गावरील तीव्र वाहतूक कोंडीमुळे वाहतूकदारांचा मोठा वेळ आणि इंधन वाया जाते. हा मार्ग सुरू झाल्यावर या कोंडीतून सुटका होऊन मालवाहतुकीसाठी एक वेगवान आणि विश्वासार्ह पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराला मोठी चालना

उत्तर आणि पश्चिम भारतातील प्रमुख औद्योगिक पट्ट्यांना मुंबईच्या जागतिक दर्जाच्या बंदर व्यवस्थेशी थेट कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे देशातील निर्यात वाढण्यास मदत होईल. नवीन उद्योग, विदेशी गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला यामुळे गती मिळणार असून, हा प्रकल्प भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये आणि पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

वरिष्ठ मंत्र्यांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्याप्रसंगी वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार राजन नाईक यांच्यासह कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक दीपक कपूर, JNPA चे अध्यक्ष गौरव दयाल, मीरा-भाईंदर वसई-विरारचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, डहाणूचे प्रकल्प अधिकारी विशाल खत्री आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.