नागपूर, (प्रतिनिधी) २९ जून - "माझी कटिबद्धता ही पूर्णपणे भारतीय संविधानाशी आणि संविधानाच्या मूल्यांशी आहे. ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पवित्र दीक्षाभूमी असून आम्ही त्यांच्या विचारांचे, तत्त्वांचे आणि घटनेच्या मूल्यांचे पाईक आहोत आणि राहू," अशा शब्दांत नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. पदभार स्वीकारल्यानंतर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमातील त्यांच्या भाषणावरून झालेल्या वादाला त्यांनी प्रथमच सविस्तर उत्तर दिले. १९ एप्रिल रोजी नवी मुंबईतील सानपाडा येथे झालेल्या कार्यक्रमात आपण केलेले भाषण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत होते आणि आपण कोणत्याही सेवा नियमांचा भंग केला नसल्याचा ठाम दावा त्यांनी यावेळी केला.
...तरुणांना ड्रग्जच्या विळख्यातून वाचवणे हेच आमचे कर्तव्य
वादावर स्पष्टीकरण देताना पोलीस आयुक्त म्हणाले, "कोणी काय बोलले हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु, कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर रात्री साडेआठ वाजता मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो. मी केवळ एका विशिष्ट संघटनेच्या कार्यक्रमालाच जात नाही, तर रमजान, बौद्ध, ख्रिश्चन तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मी नियमित सहभागी होत असतो. समाजप्रबोधन करणे आणि सकारात्मक विचार मांडणे हे माझे कर्तव्य आहे."
त्या भाषणात उपनिषदांमधील मंत्र, ज्ञानेश्वरी, देशप्रेम आणि सेवा या संस्कृतीवर आपण भाष्य केले होते. तसेच 'वंदे भारत' आणि तरुणांना ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्याची गरज या रचनात्मक विषयांवरच आपण बोललो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
एन्काऊंटरच्या भीतीवर दिले उत्तर
नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील यांना भाजप नेत्यांनी 'अर्बन नक्षल' संबोधल्यानंतर, त्यांनी पोलीस आयुक्तांकडून आपल्याला एन्काऊंटरची भीती असल्याचा आरोप केला होता. यावर नांगरे पाटील म्हणाले की, आम्हाला लोकप्रतिनिधी आणि नागरिकांबद्दल आदर व सन्मान आहे. कोणतीही कारवाई ही पूर्णपणे कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच केली जाईल, त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही.
संत्रानगरीच्या सुरक्षेसाठी विश्वास नांगरे पाटील यांचा 'ॲक्शन प्लॅन':
'ऑपरेशन थंडर'ची सुरुवात: नागपूर शहरातील विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी 'ऑपरेशन थंडर' प्रभावीपणे राबवले जात आहे.
पुराव्यावर आधारित पोलिसिंग: गुन्हेगारांवर कडक वचक ठेवण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी डिजिटल व पुराव्यावर आधारित (Evidence-based) पोलिसिंगला प्राधान्य दिले जाईल.
नागरिक आणि पोलीस एकच: "प्रत्येक पोलीस हा गणवेशातील नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा गणवेशाविना पोलीस आहे," या भावनेतून नागरिकांच्या सहभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल.
कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीर: "पोलीस कर्मचारी हे माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांच्या अंगावर हात टाकणे म्हणजे थेट माझ्यावर हात टाकण्यासारखे आहे," असा सज्जड दम भरत त्यांनी पोलिसांचे मनोबल वाढवण्यावर भर दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर विश्वास टाकून ही महत्त्वाची जबाबदारी दिली असून, संत्रानगरीतील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही विश्वास नांगरे पाटील यांनी शेवटी सांगितले.