नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २९ जून - राष्ट्रीय महामार्गांवरील रस्ते सुरक्षितता मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक पूर्णपणे अडथळामुक्त ठेवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कंबर कसली आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणाविरोधात 'NHAI'ने आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष निर्देशांचे पालन करत हा उपक्रम राबविला जात असून, प्रवाशांना सुरक्षित आणि कार्यक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. वाहनांचे अनधिकृत पार्किंग, रस्त्यांच्या कडेला होणारे अतिक्रमण आणि महामार्गांलगत होणाऱ्या अनियंत्रित हालचालींमुळे अपघातांचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर 'NHAI'ने विविध राज्यांमधील ५९५ संवेदनशील ठिकाणे अक्षांश-रेखांशाच्या (Latitude-Longitude) अचूक तपशीलांसह चिन्हांकित केली आहेत. ही अनधिकृत पार्किंगची ठिकाणे हटविण्यासाठी राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि अंमलबजावणी यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे.
जिल्हा पातळीवर 'सुरक्षा कार्यबल' स्थापन होणार
राष्ट्रीय महामार्ग (जमीन आणि वाहतूक नियंत्रण) अधिनियम, २००२ अंतर्गत महामार्गाच्या हद्दीतील सर्व अतिक्रमणे हटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारांच्या मदतीने 'जिल्हा महामार्ग सुरक्षा कार्यबल' (District Highway Safety Task Force) स्थापन केले जात आहे. तसेच, विविध यंत्रणांमध्ये ताळमेळ राखण्यासाठी 'नोडल अधिकाऱ्यांची' नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे महामार्गावरील सुरक्षेवर आता २४ तास देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.
हायटेक यंत्रणांचे (ATMS) तातडीने ऑडिट
'NHAI'ने आपल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना महामार्गांवरील प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचे (ATMS) तातडीने लेखापरीक्षण (Audit) करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील, याची खात्री केली जाईल:
वाहतूक निरीक्षण कॅमेरे (CCTV) आणि व्हिडिओ घटना शोध प्रणाली.
परिवर्तनीय वेग शोध प्रणाली आणि संदेश फलक (Digital Displays).
आपत्कालीन परिस्थितीसाठी 'कॉल बॉक्स' यंत्रणा.
अपघातांच्या वेळी जलद प्रतिसादाला प्राधान्य!
महामार्गांवर रुग्णवाहिका आणि 'रिकव्हरी' (क्रेन) वाहनांची चोवीस तास उपलब्धता, हायवे गस्त वाढवणे आणि 'ATMS' प्रणाली थेट पोलिसांच्या अंमलबजावणी यंत्रणेशी जोडणे या गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे. यामुळे महामार्गावर अपघात किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास यंत्रणांना तात्काळ प्रतिसाद देणे सोपे होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.