नाशिक, (प्रतिनिधी) २८ जून - "वाढते तापमान, अल निनोचे संकट आणि पर्यावरण संवर्धनाची गरज पाहता वृक्षारोपण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी 'हरित नाशिक' उपक्रम ही केवळ सरकारी मोहीम न राहता ती एक लोकचळवळ व्हावी. या चळवळीत प्रत्येक नागरिकाने आपले सक्रिय योगदान द्यावे," असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले. 'उन्नत नाशिक अभियान' आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व परिसरात 'हरित कुंभ - हरित मॉन्सून' उपक्रम २८ जून ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ आज 'फाशीचा डोंगर' परिसरात वृक्षारोपणाने झाला, त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य वनसंरक्षक गजेंद्र हिरे, नगरसेवक श्याम बडोदे, दिनकर पाटील, अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नद्यांचे पावित्र्य राखणे ही सर्वांची जबाबदारी
मंत्री महाजन म्हणाले की, नाशिक शहरात 'उन्नत नाशिक अभियान' वेगाने राबविले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच स्वच्छतेसाठी आग्रही असतात. गोदावरी, नंदिनी आणि कपिला या नद्या नाशिक शहराचे वैभव असून त्यांचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करावे आणि रस्त्यावर कचरा टाकणे टाळावे. मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या धर्तीवर आपण नाशिक स्वच्छ ठेवले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना
एक लाख वृक्ष लागवड: 'मिशन ग्रीन मॉन्सून' अंतर्गत १ लाख रोपे लावली जाणार असून, त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी.
नदी प्रदूषण मुक्ती: आगामी कुंभमेळा स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक करण्यासाठी गोदावरी नदी बारमाही व स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत मलजल शुद्धीकरण प्रकल्प (STP) राबविण्यात येत आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर: यंदा जाणवणारे 'अल निनो'चे संकट पाहता पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कपिला नदी महास्वच्छता अभियान संपन्न
वृक्षारोपण कार्यक्रमापूर्वी, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण आणि महानगरपालिका यांच्या वतीने आज सकाळी 'कपिला नदी महास्वच्छता अभियान' राबविण्यात आले. या अभियानात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापौर, उपमहापौर यांच्यासह मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर तसेच एनसीसीचे विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रमदान केले. याप्रसंगी हिरवाडी परिसरात मंत्री महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिनकर पाटील यांनी वृक्षारोपण मोहिमेची माहिती दिली, तर संदीप जाधव आणि शेखर गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.