नाशिक, (प्रतिनिधी) २८ जून - "प्रामाणिकपणे व्यापार करणाऱ्या व्यापारी आणि उद्योजकांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमानुसारच काम सुरू असून, कोणत्याही व्यापाऱ्याला विनाकारण त्रास दिला जाणार नाही किंवा चुकीची कारवाई होणार नाही. व्यापाऱ्यांच्या मालाच्या नमुन्याची (Sample) तपासणी प्रयोगशाळेतून अवघ्या २४ तासांत करून मिळण्यासाठी शासन पातळीवर विशेष नियोजन सुरू आहे," असे आश्वासन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. रविवार, २८ जून २०२६ रोजी सकाळी 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर'च्या उपाध्यक्षा सुनिता फाल्गुने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री झिरवाळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
या भेटीतील प्रमुख मागण्या आणि मंत्र्यांचे निर्णय खालीलप्रमाणे:
'२४ तासांत रिपोर्ट' यंत्रणेचे नियोजन; बदनामी थांबणार
चेंबरच्या उपाध्यक्षा सौ. सुनिता फाल्गुने यांनी निवेदनात नमूद केले की, सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नमुना तपासणीसाठी नेल्यानंतर त्याचा अहवाल तब्बल तीन महिन्यांनी येतो. तोपर्यंत व्यापाऱ्याला मानसिक व व्यावसायिक त्रासाला सामोरे जावे लागते. व्यापाऱ्यांचे हित आणि ग्राहकांचे आरोग्य जपण्यासाठी २४ तासांच्या आत रिपोर्ट मिळण्याची आधुनिक यंत्रणा तयार करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना मंत्री झिरवाळ म्हणाले की, "जोपर्यंत मालाची तपासणी पूर्ण होऊन लॅबचा अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत व्यापाऱ्याला दोषी धरता येणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांची विनाकारण होणारी बदनामी आणि त्रास थांबवला जाईल."
नवीन कायद्यांसाठी ६ महिन्यांचा 'ग्रेस पिरियड' देण्याची मागणी
अन्न व औषध नियमावलीतील कोणत्याही कायद्यात किंवा नियमात बदल केल्यानंतर, व्यापाऱ्यांना त्याची जुळवून घेण्यासाठी किमान ६ महिन्यांचा 'ग्रेस पिरियड' (सवलतीचा काळ) देण्यात यावा. तसेच, या नवीन कायद्यांची ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात यावी, अशी प्रमुख मागणीही शिष्टमंडळाने मंत्र्यांसमोर मांडली.
ग्रामीण आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा
खाद्यतेल क्षेत्र: तेल व्यापारी असोसिएशन महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रकाश पटेल यांनी खाद्यतेल व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी मांडल्या.
ग्रामीण व्यापार: माजी विश्वस्त विलास शिरोरे यांनी ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले.
स्पर्धेचे आव्हान: कार्यकारिणी सदस्य गंगाधर निखाडे यांनी सांगितले की, सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या काळात गावांमधील छोटे व्यापारी अत्यंत त्रस्त असून त्यांना व्यापार करणे कठीण झाले आहे, त्यामुळे प्रशासनाने सहकार्याची भूमिका घ्यावी.
शिष्टमंडळातील उपस्थित मान्यवर:
या महत्त्वपूर्ण बैठकीला महाराष्ट्र चेंबरचे माजी विश्वस्त विलास शिरोरे, कार्यकारिणी सदस्य डॉ. मिथिला कापडणीस, सचिन शहा, आशुतोष गायकवाड, स्वप्नील जैन, महेश मालपुरे, दीपक शेंडे उपस्थित होते. तसेच खाद्यतेल व्यापारी असोसिएशन महाराष्ट्रचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल, चांदमलजी भन्साळी, मदन पिचा, प्रदीप भांगडीया, विलास भाऊ, ज्ञानेश्वर मुर्तडक, पंकज लोढा, पवन लोढा, भूपेंद्रसिंग रेखी, संतोष आहिरे, ललित सामनानी, श्याम सामनानी, श्याम लढ्ढा, आकाश डागा आणि सहायक सचिव अविनाश पाठक आदी व्यापारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.