नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २८ जून - भारताच्या स्वच्छ ऊर्जा मोहीम आणि प्रगत अणु-तंत्रज्ञान क्षेत्रात आज एक सुवर्णपान लिहिले गेले. अणुऊर्जा विभागाने तामिळनाडूतील कल्पक्कम येथे 'फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर'मधील (FBTR) आण्विक उष्णतेचा वापर करून 'कॉपर-क्लोरीन (Cu–Cl) थर्मोकेमिकल सायकल'वर आधारित जगातील पहिल्या हायड्रोजन उत्पादन सुविधेचे यशस्वी उद्घाटन केले आहे. अणुऊर्जेच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर आणि पूर्णपणे कार्बन-मुक्त हायड्रोजन उत्पादनाचा मार्ग मोकळा करणारी ही जगातील पहिलीच प्रणाली आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे (AEC) अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते या ऐतिहासिक सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी 'इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च' (IGCAR) चे संचालक श्रीकुमार जी. पिल्लई प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वदेशी तंत्रज्ञानाचा आविष्कार: 'BARC' आणि 'IGCAR'चा संयुक्त पराक्रम
हे केंद्र एक 'तंत्रज्ञान प्रात्यक्षिक केंद्र' म्हणून उभारण्यात आले आहे. मुंबईतील नामांकित 'भाभा अणुसंशोधन केंद्रा'द्वारे (BARC) संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे 'Cu–Cl थर्मोकेमिकल प्रक्रिया' विकसित करण्यात आली आहे. कल्पक्कमच्या 'IGCAR' मधील फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टरमधून निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेचा वापर करून या प्रक्रियेद्वारे हायड्रोजनची निर्मिती केली जात आहे. हायड्रोजन निर्मिती प्रक्रियेला थेट अणुभट्टीच्या उष्णतेशी यशस्वीरीत्या जोडणे हे अत्यंत अवघड आणि प्रगत तांत्रिक कौशल्य मानले जाते, जे भारतीय शास्त्रज्ञांनी साध्य करून दाखवले आहे.
'आत्मनिर्भर भारत' आणि स्वच्छ ऊर्जेचे भविष्य
या ऐतिहासिक प्रसंगी बोलताना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती म्हणाले, "हायड्रोजन उत्पादनासारख्या उदयोन्मुख स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाबरोबर अणुऊर्जेचा मेळ घालणे, हा भारताच्या शाश्वत ऊर्जेच्या भविष्यासाठी एक धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण मार्ग आहे. आमच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी एका प्रगत वैज्ञानिक संकल्पनेचे प्रत्यक्ष कार्यक्षम वास्तवात रूपांतर करून दाखवले आहे. ही कामगिरी प्रगत अणुऊर्जा क्षेत्रात भारताची जागतिक पातळीवर वाढती ताकद सिद्ध करते."
या सुविधेमुळे भविष्यात भारताची इंधनावरील परकीय देशांवरील अवलंबित्व कमी होणार असून, स्वच्छ हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या समन्वयातून 'आत्मनिर्भर भारत'चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक मैलाचा दगड ठरणार आहे.