नाशिक जिल्ह्यात ३० जूनपासून सुरू होणार ही मोहीम... घरोघरी येणार...

Share:
Main Image
Last updated: 27-Jun-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २७ जून - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यात ३० जून २०२६ पासून मतदार याद्यांचा 'विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम' राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) थेट मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. ही मोहीम पूर्णपणे अचूक आणि पारदर्शक व्हावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनीही आपापल्या मतदान केंद्रांवर 'बूथ लेव्हल असिस्टंट' (BLA) नियुक्त करावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात शनिवारी (दि. २७) दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या.

बोगस, मृत आणि दुबार मतदारांना डच्चू!

पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, "या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीचे संपूर्ण शुद्धीकरण करणे हा आहे. मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्ती, कायमचे स्थलांतरित झालेले नागरिक आणि बोगस मतदारांची नावे यादीतून वगळली जातील. तसेच अपात्र किंवा परदेशी नागरिकांचा समावेश रोखला जाईल. नवीन आणि पात्र मतदारांची नोंदणी करून एकही वैध मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल."

असा असेल ‘पुनरीक्षण’ कार्यक्रम:

तयारी, प्रशिक्षण व छपाई : २० ते २९ जून २०२६

BLO मार्फत घरोघरी भेटी : ३० जून ते २९ जुलै २०२६

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण : २९ जुलै २०२६ पर्यंत

प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी : ५ ऑगस्ट २०२६

दावे व हरकती दाखल करणे : ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६

दावे व हरकती निकालात काढणे : ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६

अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी : ७ ऑक्टोबर २०२६

Advertisement

(टीप: या मोहिमेसाठी अर्हता दिनांक १ ऑक्टोबर २०२६ असा राहील.)

घर बंद असल्यास किंवा मतदार न सापडल्यास काय होणार?

या मोहिमेदरम्यान राबवली जाणारी प्रशासकीय प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली:

प्रगणना अर्ज वाटप: बीएलओ प्रत्येक मतदाराला प्रगणना अर्जाच्या दोन प्रती देतील. दुसऱ्या भेटीत भरलेला अर्ज जमा करून एक प्रत मतदाराला पावती म्हणून दिली जाईल.

घर बंद असल्यास: मतदाराचे घर बंद असल्यास अर्ज घराच्या दरवाजातून आत सरकवला जाईल. त्यानंतर अर्ज जमा करण्यासाठी बीएलओ तीन वेळा भेट देतील. तरीही अर्ज न मिळाल्यास पंचनामा केला जाईल.

मतदार स्थलांतरित झाला असल्यास: शेजाऱ्यांचा जबाब घेऊन पंचनामा केला जाईल आणि 'अर्ज क्रमांक ७' भरून संबंधित नाव दुसऱ्या यादी भागात हस्तांतरित करण्याची कारवाई होईल.

पत्ता अपूर्ण असल्यास: मतदार न सापडल्यास राजकीय पक्षांच्या 'बीएलए' (BLA) च्या मदतीने शोध घेतला जाईल. त्यानंतरही मतदार न आढळल्यास पंचनामा करून त्याचे नाव यादीतून वगळण्यात येईल.

नागरिकांनी सहकार्य करावे!

"मतदार यादी शुद्धीकरणाची ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्हा प्रशासनाने अर्जांच्या छपाईसह सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करून ही मोहीम यशस्वी करावी."

— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.