यवतमाळ, (प्रतिनिधी) २७ जून - "शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द या भरवशावर ज्या 'बुजगावण्याला' तुम्ही रक्ताचे पाणी करून, पावसाची तमा न बाळगता निवडून दिले, त्यानेच गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळे फासले. ही माझी चूक होती आणि त्यासाठी मी मतदारसंघातील जनतेची जाहीर माफी मागतो," अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमधील पहिल्याच सभेत मतदारांसमोर हात जोडले. पक्षातील खासदारांनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट फुटीरांच्या बालेकिल्ल्यात जात 'पलटवार' दौऱ्याची तोफ डागली आहे. २७ ते २९ जून या तीन दिवसांच्या विदर्भ-मराठवाडा दौऱ्याची सुरुवात शनिवारी यवतमाळमधून झाली. यावेळी झालेल्या भव्य सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंडखोर खासदार आणि भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली.
गद्दार जिथे सापडेल तिथे जाब विचारा!
बंडखोरांचा 'गद्दार शिरोमणी' असा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, "तीन-चार वर्षांपूर्वी तिकडे बसलेल्या मिंध्याने ४० आमदार फोडले. विदर्भात बैलपोळ्याला बैलांवर '५० खोके, एकदम ओके' असे लिहिले गेले होते, इतकी यांची नाचक्की झाली. इकडे ते वाघाचे जीवन जगत होते, तिकडे जाऊन गाढवाचे जीवन जगत आहेत. गद्दार जिथे जिथे सापडेल, तिथे जनतेने त्यांना जाब विचारलाच पाहिजे."
विकास निधी काय भाजपच्या बापाचा आहे का?
विकास निधीवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ठाकरे यांनी भाजपला धारेवर धरले. "हे विकास निधीच्या नावावर बोंबलत आहेत. पण विकास निधी हा काय भाजपच्या बापाचा निधी आहे का? महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली होती. मात्र, यांची वृत्तीच फसवणुकीची आहे. भाजपने हिंदूंचीही गद्दारी केली आहे. राम मंदिरातील सोन्याच्या चोरीचे काय झाले, हे कोणालाच माहीत नाही. आम्हाला आता 'भाजपमुक्त राम' पाहिजे आहे," असा घणाघात त्यांनी केला.
पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही!
"शिवसेना काय आहे, हे विरोधकांच्या आकलनापलीकडचे आहे. दोन-चार गद्दार फोडले म्हणजे शिवसेना संपली, असा त्यांचा गैरसमज आहे. पण जोपर्यंत तुमच्यासारखे कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत विरोधकांच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही."
— उद्धव ठाकरे
पुढील महिन्यात नागपुरात भव्य मेळावा
विमानतळावर झालेल्या जंगी स्वागतानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी नागपुरात लवकरच भव्य शिवसैनिक मेळावा घेण्याची घोषणा केली. "मी पुन्हा नागपुरात येणार आहे. कस्तुरचंद पार्कवर पूर्वी झाली होती, तशीच प्रचंड सभा घेऊ. सरकारने तेवढे मोठे मैदान शिल्लक ठेवले असेल, तर त्याच मैदानावर सभा होईल. शिवसेनेच्या मुळावर जो कोणी येईल, त्याला राजकीय उत्तर दिल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत," असा इशारा त्यांनी दिला.
असा आहे उद्धव ठाकरेंचा 'पलटवार' दौरा
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या तीन दिवसांच्या झंझावाती दौऱ्यात यवतमाळ-वाशिम, नांदेड-हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. "आता पलटवार होणार..." अशा टॅगलाईनसह ठाकरे गटाने या दौऱ्याचा ट्रेलर रिलीज केला असून, या दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.