पुणे, (प्रतिनिधी) २७ जून - श्रीक्षेत्र आळंदी हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, येथे येणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांना अधिक चांगल्या आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज येथे दिली. तसेच मागील १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला 'श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर दर्शन बारी'चा विषय प्राधान्याने आणि तातडीने मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी आज आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे भावपूर्ण दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माउलींच्या चरणी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीचे, चांगल्या पावसाचे आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाचे साकडे घातले.
संस्थानच्या मागण्यांवर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय
दर्शनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 'श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी'च्या विश्वस्तांसोबत एक विशेष बैठक घेतली. या बैठकीत संस्थानच्या वतीने आळंदीच्या विकासाचे विविध प्रस्ताव, भाविकांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि मंदिरासमोरील अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले. या संदर्भातील मागण्यांचे एक सविस्तर निवेदनही संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
या निवेदनाची दखल घेत उपमुख्यमंत्री म्हणाल्या, "संस्थानने मांडलेल्या सर्व मागण्यांवर शासन स्तरावर अत्यंत सकारात्मक विचार केला जाईल. संबंधित सर्व शासकीय विभागांशी तातडीने समन्वय साधून यावर योग्य व ठोस निर्णय घेतले जातील."
प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती
या महत्त्वाच्या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. तर संस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर लोंढे, पुरुषोत्तम पाटील, ॲड. रोहिणी पवार, वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि विविध प्रशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.