पुणे, (प्रतिनिधी) २७ जून - पुण्यातील 'सारथी' संस्थेच्या एका शासकीय कार्यक्रमात सत्ताधारी भाजपमधील खासदार आणि आमदारांमध्ये स्टेजवर बसण्याच्या जागेवरून तीव्र वाद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच, स्टेजच्या पहिल्या रांगेत बसण्यावरून हा वाद थेट 'मराठा विरुद्ध ब्राह्मण' अशा जातीय वादावर जाऊन पोहोचला. भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे, तर या वादावरून मेधा कुलकर्णी थेट कार्यक्रम सोडून निघून गेल्या.
"मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही"
मिळालेल्या माहितीनुसार, प्रोटोकॉलनुसार (शिष्टाचार) पहिल्या रांगेत खासदार म्हणून मेधा कुलकर्णी यांची जागा निश्चित करण्यात आली होती आणि त्या तिथे बसल्या होत्या. मात्र, आमदार अभिमन्यू पवार यांना त्या ठिकाणी बसायचे असल्याने तिथे धावपळ सुरू झाली.
या प्रसंगाबाबत मेधा कुलकर्णी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत सांगितले की,
"प्रोटोकॉलनुसार पहिल्या रांगेत खासदार म्हणून माझी जागा होती. पण अभिमन्यू पवारांना त्या ठिकाणी बसायचे होते. त्यावेळी त्यांनी मला थेट सांगितले की, 'हा कार्यक्रम मराठा समाजाचा (सारथी) आहे, तुम्ही तिथे पहिल्या रांगेत बसाल तर वाद निर्माण होईल. तुम्ही मागे बसा.' एखाद्या खासदाराला अशा प्रकारे जातीचा उल्लेख करून उठवणे अत्यंत चुकीचे आहे."
मेधा कुलकर्णींचा संताप; कार्यक्रम अर्धवट सोडला
आमदार अभिमन्यू पवार यांनी जाहीरपणे केलेल्या या विधानामुळे मेधा कुलकर्णी अत्यंत संतप्त झाल्या. शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधीला मिळणारी वागणूक आणि थेट जातीवर गेलेला वाद पाहता, त्यांनी पुढील सर्व कार्यक्रम सोडून तात्काळ तिथून निघून जाणे पसंत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टेजवर बोलत असतानाच महायुतीतील आणि विशेषतः भाजपमधीलच दोन लोकप्रतिनिधींमध्ये जाहीर व्यासपीठावर असा वाद झाल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.