विद्यार्थ्यांसाठी करिअरची सुवर्णसंधी... पुणे येथे मिळेल १५ दिवसांचे मोफत प्रशिक्षण...

Share:
Main Image
Last updated: 26-Jun-2026

पुणे, (प्रतिनिधी) २६ जून - विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत मानस मित्र’ हा नाविन्यपूर्ण समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचसाठी पात्र उमेदवारांना २९ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून, मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी ही एक मोठी संधी आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाची अग्रगण्य संस्था 'महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था' (एमआयएमएच), पुणे ही तांत्रिक व शैक्षणिक भागीदार म्हणून काम पाहणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार कौशल्याधारित शिक्षण आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये समुपदेशनाच्या तरतुदीला अनुसरून हा उपक्रम राबवला जात आहे.

प्रशिक्षणाचे स्वरूप व टप्पे

तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे दिले जाणारे हे प्रशिक्षण प्रामुख्याने पुढील टप्प्यांत विभागले गेले आहे:

१५ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण: पुणे येथे थेट संवाद सत्रे, केस स्टडीज आणि प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण दिले जाईल.

१ महिन्याचा फिल्ड एक्स्पोजर: प्रशिक्षणानंतर उमेदवारांना जिल्हा पातळीवरील शाळा किंवा महाविद्यालयांशी जोडून प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जाईल.

३ ते ५ महिने व्यावसायिक सहाय्य: प्रत्यक्ष कामात येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी 'एमआयएमएच'मार्फत नियमित मॉनिटरिंग, मेंटरिंग आणि ऑनलाईन सत्रे घेतली जातील.

अधिकृत प्रमाणपत्र: प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना 'अमृत' व 'एमआयएमएच' यांचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

पात्रता निकष

Advertisement

'अमृत'च्या लक्षित गटातील खालीलपैकी कोणतीही एक पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार या मोफत प्रशिक्षणासाठी पात्र असतील:

१. एम.ए. / एम.एस्सी. (मानसशास्त्र)

२. एम.ए. / एम.एस्सी. (समुपदेशन मानसशास्त्र)

३. मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW)

(टीप: या क्षेत्रात आधीपासून कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.)

महत्त्वाची नोंद: हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असले, तरी प्रशिक्षणादरम्यान पुणे येथील निवास, भोजन व राहण्याची व्यवस्था उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने करावी लागणार आहे.

अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धत

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. आलेल्या अर्जांची छाननी करून ओरिएंटेशन सत्र, परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. या प्रक्रियेत उमेदवारांचा पूर्वअनुभव आणि 'प्रथम येईल त्यास प्राधान्य' या तत्त्वाचा विचार करून अंतिम नावे निश्चित केली जातील. तरी जास्तीत जास्त पात्र युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन 'अमृत' प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.