अयोध्या मंदिर देणगी अपहार... उद्धव ठाकरेंनी दिलेली ४ किलो चांदीची वीट गायब?

Share:
Main Image
Last updated: 26-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २६ जून - अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या देणग्या आणि दानामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) प्राथमिक अहवालानंतर, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याप्रकरणी रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध नावांसह एफआयआर (FIR) दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपी अनुकल्प मिश्रा याला रीतसर अटक केली असून, इतर ७ प्रमुख आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे, या मोठ्या घोटाळ्यावरून राजकीय वातावरणही तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

'शिवसेनेने दिलेली ४ किलोची चांदीची वीट कुठे गेली?' – संजय राऊत

या घोटाळ्यावर तीव्र प्रतिक्रिया देत खासदार संजय राऊत यांनी थेट ट्रस्टला धारेवर धरले. राऊत म्हणाले,

"अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू-संतांच्या उपस्थितीत १ कोटी रुपये आणि ४ किलो वजनाची पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. मात्र, इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून या दानाची कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती चांदीची वीट नक्की कुठे गेली? आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे."

'अशी' झाली कारवाई आणि पैशांची जप्ती

राम मंदिर ट्रस्टचे सदस्य श्रीकृष्ण मोहन यांनी 'एसआयटी'च्या प्राथमिक अहवालाच्या आधारे पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (PC Act) आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांनुसार (कलम ३०६, ३१६, ३१७, ६१ आणि ३(५) इत्यादी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपी हे मंदिरात देणग्या मोजणे, रोख रक्कम हाताळणे आणि आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्याच्या कामात गुंतलेले होते. तपासादरम्यान मुख्य आरोपी अनुकल्प मिश्रा याच्याकडून कथित रक्कमेची वसुली करून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी लवकुश मिश्रा याच्या घरातून १२ लाख रुपये, तर मनीष यादव याच्या घरातून ३६ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

एफआयआरमधील ८ आरोपी आणि त्यांच्यावरील आरोप:

रामाशंकर यादव उर्फ टिन्नू यादव: ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा चालक आणि अत्यंत जवळचा व्यक्ती. दानपेटीची देखभाल करणे आणि तळघरात देणग्या पोहोचवण्याची जबाबदारी याच्यावर होती. दानपेटीतून कोट्यवधींची चोरी करून स्वतःची संपत्ती कमावल्याचा आरोप.

Advertisement

लवकुश मिश्रा: रोकड मोजणी कर्मचारी. घरातून १२ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त.

अनुकल्प मिश्रा (अटक): मोजणी खोलीत पैसे मोजताना चोरी करून ते बाथरूममध्ये लपवत असे. यातून त्याने कोट्यवधींची अवैध संपत्ती जमा केल्याचा आरोप.

सुभाष चंद्र श्रीवास्तव: रोख मोजणी कर्मचाऱ्यांचे प्रमुख. देखरेखीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून चोरीत सामील असल्याचा आरोप.

करुणेश पांडे: देणग्या मोजणी खोलीत आणणारा कर्मचारी. चोरलेल्या पैशातून अयोध्या व परिसरात जमिनी खरेदी केल्याचा आरोप.

मनीष यादव: देणग्यांच्या अपहाराचा आरोप. घरातून ३६ लाख रुपये जप्त.

अविनाश शुक्ला: दानपेटीतून रकमा मोजणी खोलीत आणणारा कर्मचारी. निधीचा अपहार केल्याचा आरोप.

रामाशंकर मिश्रा: देणग्या सुरक्षितपणे आणणे आणि देखरेखीची जबाबदारी. चोरीच्या पैशातून स्वतःची मालमत्ता बनवल्याचा आरोप.

या संपूर्ण प्रकरणामुळे राम मंदिर ट्रस्टच्या सुरक्षेवर आणि अंतर्गत व्यवहारांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, पोलीस आता या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे, याचा सखोल तपास करत आहेत.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.