मुंबई/नाशिक, (प्रतिनिधी) २५ जून - नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात अत्याधुनिक कृषीमाल विक्री केंद्र व शीतगृह उभारणार येईल. यासाठी तातडीने नाशिक मनपा आयुक्तांकडून प्रस्ताव मागविण्यात येऊन लवकरच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, अशी माहिती आमदार पंकज भुजबळ यांनी आज विधानपरिषदेच्या सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उद्योग मंत्री उदय सामंत व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. विधानपरिषद पावसाळी अधिवेशनादरम्यान नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बळीराजाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या असलेल्या अत्याधुनिक कृषीमाल विक्री केंद्र उभारणी संदर्भात विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली.
या लक्षवेधीत आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, नाशिक महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व फळबागांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, स्थानिक पातळीवर अत्याधुनिक कृषीमाल विक्री केंद्र उपलब्ध नसल्याने येथील शेतकऱ्यांना आपला शेतमाल मुंबईसह इतर दूरच्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी न्यावा लागत आहे. यामुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ होऊन शेतकऱ्यांना अनावश्यक आर्थिक फटका बसत आहे. तसेच कार्यक्षेत्रात पुरेशी शीतगृह सुविधा नसल्याने नाशवंत कृषीमालाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते व शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते, ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली.
शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक या तिन्हींना एकाच छताखाली हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नाशिकमध्ये अत्याधुनिक शीतगृहासह बहुउद्देशीय शेतकरी-व्यापारी-ग्राहक मार्केट उभारणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या दिरंगाईकडे आमदार पंकज भुजबळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच या प्रकरणी तातडीने विशेष निधी मंजूर करून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, अशी आग्रही मागणी आमदार पंकज भुजबळ यांनी लावून धरली.
यावर उद्योग मंत्री उदय सामंत आणि पणन विभाग मंत्री जयकुमार रावल यांनी सकारात्मक उत्तर देत लवकरच एक संयुक्त बैठक घेऊन सदर प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच सदर प्रकल्पासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही करून या प्रस्तावावर आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांच्याकडून तातडीने सविस्तर अहवाल मागविण्यात येईल असे मंत्री महोदयांनी सभागृहात सांगितले.