मुंबई, (प्रतिनिधी) २५ जून - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक पत्र लिहिले आहे. ईशान्य मुंबईतील 'फुटीर' खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची आणि थेट बॉम्ब टाकण्याची जाहीर धमकी दिल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. संजय पाटील यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा आपल्याला न्यायालयात दाद मागावी लागेल, असा सूचक इशारा संजय राऊतांनी या पत्रातून दिला आहे. या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
'मी ५ लोकांना ठार केले' : संजय पाटलांची कथित कबुली
संजय राऊत यांनी पत्रात दावा केला आहे की, खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना धमकावताना, "माझ्या नादाला लागू नका, मी याआधी ५ लोकांना ठार केले आहे आणि आता माझ्याविरोधात आंदोलन केल्यास घरात घुसून थेट बॉम्ब टाकेन. माझ्याविरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या, मी सरळ तुम्हाला स्मशानात किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवीन," असे वक्तव्य केले आहे.
संजय पाटील यांनी स्वतःच ५ जणांच्या हत्येची कबुली दिल्यामुळे, हे ५ लोक कोण? आणि त्यांची हत्या कधी व का करण्यात आली? याचा तपास करून त्यांच्यावर तातडीने खुनाचा (हत्येचा) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.
'एटीएस' आणि 'UAPA' अंतर्गत कारवाईची मागणी
एका विद्यमान खासदाराकडून जाहीरपणे बॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा अतिशय गंभीर मुद्दा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
घराची झडती घ्या: संजय पाटील यांनी हे बॉम्ब आपल्या घरात तयार केले आहेत का? की त्यांना ते एखाद्या दहशतवादी टोळीकडून मिळाले आहेत? याचा तपास करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाद्वारे (ATS) त्यांच्या घराची त्वरित झडती घेण्यात यावी.
UAPA अंतर्गत कारवाई: राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून त्यांच्यावर थेट अनलॉफुल ॲक्टिव्हिटीझ प्रिव्हेंशन ॲक्ट (UAPA) अंतर्गत कारवाई करून अटक करण्यात यावी, अशी आग्रही मागणी राऊतांनी पत्रात केली आहे.
कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची चिंता; कोर्टात जाण्याचा इशारा
"सध्याच्या फुटीविरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेत कमालीचा संताप असून मतदार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, खा. पाटील यांच्या धमकीमुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. या काळात जर एखाद्या राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाला किंवा खून झाला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संजय पाटील यांच्यावरच राहील," असे राऊत यांनी पत्रात स्पष्ट नमूद केले आहे. पोलीस आयुक्तांनी यावर त्वरित पावले न उचलल्यास जनतेच्या सुरक्षेसाठी कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.