एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण... आई गंगुबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ दिली एवढ्या चांदीची भेट...

Share:
Main Image
Last updated: 24-Jun-2026

 जळगाव, (प्रतिनिधी) २४ जून - "आदिशक्ती  मुक्ताईच्या कृपेने राज्यात भरघोस पाऊस पडू दे, बळीराजाच्या कष्टाला यश येऊ दे, शेतकरी, वारकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे," अशी मनःपूर्वक  प्रार्थना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी केली. विशेष म्हणजे, अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस याच कालावधीत मुक्ताईनगर तालुका, परिसर आणि जळगाव जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात बरसल्याने वारकरी आणि शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आई मुक्ताईने वारकऱ्यांचे आणि बळीराजाचे गाऱ्हाणे ऐकले, अशी भावना यावेळी व्यक्त होत होती. गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण करत त्यांच्या मातोश्री  गंगुबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासाठी खास सागवान लाकडापासून तयार करण्यात आलेला व जर्मन चांदीचा मुलामा चढविलेला भव्य रथ भेट करण्यात आला. या रथामुळे यंदाच्या पालखी सोहळ्याचे आकर्षण अधिक वाढले असून वारकरी भावविश्वात कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे.

आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याला मुक्ताईनगर येथून उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिरात दर्शन घेऊन पालखीचे पूजन केले. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः पालखीचे सारथ्य करत पालखी सोहळ्याचा शुभारंभ केला. टाळ-मृदंगाच्या गजरात, "ज्ञानोबा माऊली-तुकोबा माऊली"च्या जयघोषात आणि हजारो वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी खतगावकर, दिंडी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे , विविध विभागांचे अधिकारी तसेच हजारो वारकरी आणि भाविक उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गेल्या वर्षी पालखी सोहळ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे यंदा त्यांच्या आई गंगुबाई यांच्या स्मरणार्थ संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासाठी चांदीचा रथ भेट दिला आहे.

पांडुरंगाच्या कृपेने आपण मंत्रीपदापर्यंत पोहोचलो असून गेल्या ३५ वर्षांत एकही वारी चुकलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील वारकऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून विशेष उपक्रम राबविण्यात येत असून यावर्षीही वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

संत मुक्ताई संस्थानच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा गौरव करत संत मुक्ताईंच्या पालखीला राज्यात विशेष मान असल्याचे सांगितले.

राज्य शासनाने देवस्थानांच्या विकासासाठी निधीत मोठी वाढ केली असून संत मुक्ताई देवस्थानाच्या विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. देवस्थानाच्या उर्वरित विकासकामांसाठी लागणारे १५ कोटी रुपये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मंजूर केले जातील. संत मुक्ताई देवस्थानच्या विकासात निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, मुक्ताई पालखी सोहळ्याशी आपले दरवर्षीचे भावनिक नाते आहे. यंदा पावसाअभावी चिंतेचे वातावरण असताना मुक्ताईनगरला येताना "आई मुक्ताबाई, पाऊस येऊ दे" अशी प्रार्थना केली होती. मात्र येथे पोहोचताच परिसरात झालेल्या पावसामुळे आई मुक्ताईने वारकरी आणि शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

सामूहिक प्रार्थनेची ताकद आणि संतभूमीचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी बळीराजावर आई मुक्ताईची कृपा कायम राहो, अशी प्रार्थना केली.

तापी नदीच्या तीरापासून चंद्रभागेच्या तीरापर्यंतचा प्रवास करणारी संत मुक्ताबाईंची पालखी महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर पार करणाऱ्या पालख्यांपैकी एक मानली जाते. भक्ती, श्रद्धा आणि संतपरंपरेचा जागर करणाऱ्या या सोहळ्यामुळे मुक्ताईनगर-कोथळी परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला असून हजारो वारकरी "ज्ञानोबा-तुकोबा"च्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.