मुंबई, (प्रतिनिधी) २४ जून - ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावाचे वाचन करताना मराठी भाषेची चिरफाड केल्याप्रकरणी चौफेर कोंडीत सापडलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर नमते घेतले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कडक शब्दांत ओढलेले ताशेरे आणि सोशल मीडियावरील तीव्र प्रहारानंतर, अध्यक्ष नार्वेकर यांनी आज विधानसभेत अधिकृत स्पष्टीकरण देत मनापासून दिलगिरी व्यक्त केली. "त्या दिवशी हातात आलेली प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये आणि अस्पष्ट होती, त्यामुळे ही चूक घडली," अशी कबुली त्यांनी दिली.
तांत्रिक चुकांमुळे गोंधळ उडाला!
आपली बाजू मांडताना राहुल नार्वेकर म्हणाले, "त्या दिवशी सभागृहात एकूण १२ शोकप्रस्ताव होते आणि त्यांचे वाचन मी करत होतो. जी प्रिंट माझ्या हातात आली, ती अत्यंत बारीक अक्षरांत आणि अस्पष्ट होती. तसेच, त्या मजकुरात काही तांत्रिक चुका होत्या, ज्या सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आल्या नव्हत्या. वाचन करत असताना ते तसंच्या तसं वाचलं गेलं. वाचन करताना माझ्याकडून ती एक चूक घडली."
...तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो!
आशाताईंच्या नावाचा आणि मराठीचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट करत नार्वेकर म्हणाले, "स्वर्गीय आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही या राज्यातील कोणतीही व्यक्ती करू शकत नाही; आणि निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असं करू शकत नाहीत. जे घडलं ते केवळ एका चुकीमुळे घडलं आहे, त्याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये. तरीही, त्या भाषणाच्या वाचनाच्या वेळी जर का राज्यातील किंवा सभागृहातील कोणत्याही व्यक्तीचे किंवा सदस्याचे मन दुखले असेल, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो."
'तेवढाच मलाही मराठीचा अभिमान'
"गेली चार-साडेचार वर्षे मी या सभागृहात अध्यक्ष म्हणून काम करत आहे. या काळात मी अनेक भाषणे आणि शोकप्रस्ताव मराठीतच मांडले आहेत. सभागृहाची संपूर्ण कार्यपद्धती आणि नियम आपण मराठी भाषेतूनच हाताळले आहेत. जेवढा अभिमान मराठी भाषेबद्दल या सभागृहातील प्रत्येक सदस्याला आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाला आहे, तेवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक अभिमान मला स्वतःला मराठी भाषेबद्दल आहे."
— राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष
राज ठाकरेंचा 'बुलडोझर' आणि नार्वेकरांची माघार
शोकप्रस्तावात दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख 'दीनदयाल' करण्यासह २६ हून अधिक चुका केल्याबद्दल राज ठाकरे यांनी "नार्वेकरांनी मराठी भाषेवर बेजबाबदार बुलडोझर फिरवला" अशी घणाघाती टीका केली होती. सोशल मीडियावरही नेटिझन्सनी अध्यक्षांना धारेवर धरले होते. या वाढत्या दबावामुळेच अखेर अधिवेशनादरम्यान अध्यक्षांना जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करावी लागल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.