मुंबई, (प्रतिनिधी) २३ जून - आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (ST) यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. यंदा भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी राज्यभरातून तब्बल ५,५०० विशेष बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास, थेट त्याच गावातून पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
'महिला सन्मान' आणि 'अमृत ज्येष्ठ नागरिक' सवलती कायम
या विशेष बस सेवेमध्येही शासनाने लागू केलेल्या सर्व प्रवासी सवलती वारकऱ्यांना पूर्ववत मिळत राहतील.
महिला प्रवाशांसाठी: ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाईल.
७५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी: ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत मोफत प्रवासाची सोय असेल.
गतवर्षीचा विक्रम: मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने ५,२०० विशेष बसेस चालवून तब्बल २१ लाख ९५ हजार भाविकांना सुरक्षित सेवा दिली होती. यंदा भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता अधिक सक्षम नियोजन करण्यात आले आहे.
पंढरपुरात ४ तात्पुरती बस स्थानके
एकादशीच्या दिवशी आणि यात्र काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पंढरपूर शहरात ४ तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. यामध्ये खालील स्थानकांचा समावेश आहे:
१. चंद्रभागा बस स्थानक
२. भीमा (देगाव) बस स्थानक
३. विठ्ठल कारखाना बस स्थानक
४. पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) बस स्थानक
या सर्व स्थानकांवर पिण्याचे शुद्ध पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आणि मार्गदर्शन फलक अशा सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीचे ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलिसांच्या मदतीने तैनात असतील.
१३ हजार कर्मचाऱ्यांसाठी मंत्र्यांच्या स्वखर्चातून भोजनाची व्यवस्था
वारीच्या काळात रात्रंदिवस सेवा देणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी अशा सुमारे १३,०३० कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था त्यांनी वैयक्तिक स्वखर्चातून केली आहे.
"वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा या भावनेतून एसटी यंत्रणा यात्राकाळात अहोरात्र कार्यरत राहणार आहे. राज्यभरातील भाविकांनी एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवेचा लाभ घ्यावा," असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.