संगमनेर, (प्रतिनिधी) २३ जून - शेतजमिनीच्या सपाटीकरणाचे काम करू देण्याच्या मोबदल्यात मंडल अधिकारी व तलाठी यांच्या नावावर शेतकऱ्याकडून ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. नितीन किसन खर्डे (वय २९, रा. मु.पो. चंदनपुरी झोळे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार हे जेसीबी मशीनच्या साहाय्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम करतात. दि. ०८ जून २०२६ रोजी नितीन खर्डे याने तक्रारदारांना तलाठी कार्यालय येथे बोलावून घेतले होते. त्या वेळी तेथे मंडल अधिकारी व तलाठी यांनी सदर कामाबाबत तक्रारदारांशी चर्चा केली. त्यानंतर तक्रारदार तलाठी कार्यालयाबाहेर जात असताना, नितीन खर्डे याने त्यांना गाठले. "शेतजमिनीच्या सपाटीकरणाचे काम करायचे असेल, तर मंडल अधिकारी यांच्याकरिता ५,००० रुपये द्यावे लागतील. नाहीतर तुझ्यावर अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल केला जाईल," अशी धमकी देत खर्डे याने ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
'एसीबी'च्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध
कारवाईची धमकी मिळाल्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नाशिक कार्यालयात रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे 'एसीबी'च्या पथकाने १९ जून २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी (Verification) केली. या पडताळणीदरम्यान खाजगी इसम नितीन खर्डे याने तक्रारदाराकडे ५,००० रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
तलाठी कार्यालयाबाहेरच रचला सापळा
लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर आज, सोमवार दि. २२ जून २०२६ रोजी 'एसीबी'च्या पथकाने लाचखोर विरोधी सापळा कारवाईचे आयोजन केले. तक्रारदाराकडून तलाठी कार्यालयाबाहेर ५,००० रुपयांची लाच (५०० रुपयांच्या १० नोटा) स्वीकारताना संशयित आरोपी नितीन खर्डे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७-अ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
या पथकाने केली कारवाई
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी, पोलीस अंमलदार संदीप वनवे आणि प्रमोद पाळदे यांच्या पथकाने केली.