नाशिकचा निकाल... पराभवानंतर महायुतीत आरोप-प्रत्यारोपांची राळ... बघा, कोण काय म्हणाले?

Share:
Main Image
Last updated: 22-Jun-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) २२ जून - नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी महायुतीवर केलेल्या 'विश्वासघाता'च्या आरोपांनंतर आता विजयी उमेदवार गोकुळ गीते, भाजप आणि संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. या निकालाने महायुतीला मोठा फटका बसल्याचे मान्य करत भाजपने या बंडखोरीची अंतर्गत चौकशी करण्याची घोषणा केली आहे.

निकालानंतर प्रमुख नेत्यांनी मांडलेली भूमिका आणि दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत:

१) "माझा 'बाप' काढला म्हणून मी 'बाप' दाखवून दिला!" - गोकुळ गीते (विजयी उमेदवार)

ऐतिहासिक विजयानंतर घरी पोहोचताच गोकुळ गीते यांचे त्यांच्या आईने पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. या भावुक क्षणानंतर दराडे बंधूंवर घणाघाती प्रहार करताना गोकुळ गीते म्हणाले:

"मी निवडणुकीतून अधिकृतपणे माघार कधीच घेतली नव्हती. केवळ महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देऊन मी माझा उघड प्रचार थांबवला होता. परंतु, मी घरात बसलेलो असतानाही माझ्या पाठीशी असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि मित्रांनी पडद्यामागून गुप्त प्रचार सुरू ठेवला आणि मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. माझे वडील गेल्या ८ वर्षांपासून पॅरेलाईज (पक्षाघातग्रस्त) आहेत. अशा परिस्थितीतही निवडणुकीच्या काळात विरोधकांनी माझ्या वडिलांचा (बापाचा) उल्लेख केला, त्यांचा अपमान केला; म्हणून आज मतदारांच्या बळावर मी त्यांना 'बाप' दाखवून दिला आहे. हा विजय मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करतो."

२) "आमच्या रक्तात गद्दारी नाही!" - गिरीश महाजन (मंत्री, भाजप)

Advertisement

महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी पराभवानंतर "केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडले तर महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझा घात केला," असा थेट आरोप केला होता. या आरोपांना चोख उत्तर देताना भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन म्हणाले:

"झालेल्या अनपेक्षित पराभवामुळे नरेंद्र दराडे सध्या प्रचंड रागात आणि नैराश्यात आहेत, म्हणूनच ते अशी चुकीची वक्तव्ये करत आहेत. मात्र त्यांनी जाहीरपणे अशी विधाने करू नयेत. आमच्या किंवा भाजपच्या रक्तात कोणाशीही अशी गद्दारी करणे नाहीये. निवडणुकीत नक्की काय घडले, आमच्या बाजूने कोण उभे राहिले आणि कोणी पाठ फिरवली, या सगळ्याची सखोल चौकशी केली जाईल."

३) "बंडखोरीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करणार" - नवनाथ बन (प्रवक्ते, भाजप)

नाशिकमधील या अंतर्गत फुटीमुळे भाजपची कोंडी झाली असून, पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नवनाथ बन यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले:

"नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निश्चितपणे महायुतीला मोठा फटका बसला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे सर्व प्रमुख नेते एकत्र बसून सविस्तर चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय घेतील. मुळात ही बंडखोरी का झाली, या बंडखोरीला पडद्यामागून कोणी पाठिंबा किंवा समर्थन दिले, याची निश्चितपणे चौकशी केली जाईल. यासाठी वरिष्ठ पातळीवर एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार असून, समितीच्या अहवालानंतर पुढील कडक पावले उचलली जातील."

थोडक्यात काय तर...

नाशिकच्या या निकालाने केवळ दराडे बंधूंचा पराभव केला नसून, महायुतीमधील अंतर्गत समन्वयाचे धिंडवडे काढले आहेत. गोकुळ गीतेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि दराडेंच्या 'विश्वासघाता'च्या आरोपांमुळे आगामी काळात नाशिक जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.