नाशिकमध्ये महायुतीचा 'करेक्ट कार्यक्रम'... अपक्ष गोकुळ गीतेंचा ऐतिहासिक विजय... नरेंद्र दराडेंचा धुव्वा...

Share:
Main Image
Last updated: 22-Jun-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २२ जून - अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर अत्यंत धक्कादायक उलटफेर झाला आहे. निवडणुकीतून माघार घेतल्याची केवळ चर्चा असलेल्या आणि भाजपमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मोठ्या मताधिक्याने धुव्वा उडवला. पहिल्याच फेरीच्या मतमोजणीत विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा पूर्ण करत गोकुळ गीते यांनी नाशिकच्या गडात ऐतिहासिक विजय संपादित केला. या पराभवामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात महायुतीला, विशेषतः शिवसेना (शिंदे गट) पक्षाला प्रचंड मोठा झटका बसला आहे.

या निकालामुळे जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून केंद्राबाहेर गोकुळ गीते समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे.

पहिल्याच फेरीत खेळ खल्लास! असा लागला निकाल :

गेल्या १८ जून रोजी झालेल्या या निवडणुकीत एकूण ६१९ पैकी ६१८ (९९.८४%) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सकाळी ४ टेबलांवर मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली.

एकूण मतदान: ६१८ मते

अवैध मते: १३ मते

वैध मते: ६०५ मते

विजयासाठी आवश्यक कोटा: ३०३ मते

या मतमोजणीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी तब्बल ३५७ मते मिळवत विजयाचा टप्पा सहज पार केला. तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ २४८ मते मिळवता आली. रिंगणात असलेले तिसरे उमेदवार प्रसाद हिरे यांना 'शून्य' मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्याच फेरीत गीतेंनी ३०३ चा आकडा पार केल्यामुळे दुसऱ्या पसंतीक्रमाची गरजच उरली नाही.

Advertisement

महायुती नेत्यांकडून ठरवून विश्वासघात; दराडे बंधूंचा घणाघाती आरोप

अंतिम निकालाचा अंदाज आल्यानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आणि त्यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी मतमोजणी केंद्रावरून तडक काढता पाय घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना नरेंद्र दराडे यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.

"एकनाथ शिंदे सोडून सर्वांनी पाडलं!"

"माझा ठरवून विश्वासघात करण्यात आला आहे. महायुतीमध्ये असूनही सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मला अंधारात ठेवून पाडलं. त्यांनी आतून विरोधी उमेदवाराला ताकद दिली आणि माझी ताकद काढून घेतली. मी आशेवर राहिलो, पण माझा घात झाला. केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सोडले, तर महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझा विश्वासघात केला," असा खळबळजनक आरोप नरेंद्र दराडे यांनी केला.

यापूर्वी मतदानाच्या दिवशीही दराडे यांनी थेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आक्षेप घेत, भुजबळ यांच्या आधिपत्याखालील येवला येथील नगरसेवकांनी विरोधी उमेदवाराला मतदान केल्याचा उघड आरोप केला होता.

तीन मंत्र्यांची मनधरणी अपयशी; छुपा पाठिंबा ठरला प्रभावी

नाशिकमधील ही बंडखोरी मोडीत काढण्यासाठी महायुतीला सुरुवातीपासूनच मोठी कसरत करावी लागली होती. भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, गिरीश महाजन आणि दादा भुसे या तीन मंत्र्यांना नाशिकमध्ये तब्बल दहा दिवस ठाण मांडून बसावे लागले होते. मात्र, गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात ठाम राहिले.

नाशिक जिल्ह्यातील संख्याबळ पाहता महायुतीचे पारडे जड होते, मात्र भाजपच्या काही प्रमुख नेत्यांसह शिवसेना शिंदे गटातील एका बड्या आमदाराने पडद्यामागून गीतेंना रसद पुरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महायुतीची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्यानेच गीतेंचा हा एकतर्फी विजय सुकर झाला. "मी मतदारांचा उद्रेक पाहिला होता, त्यामुळे मीच जिंकणार," हा गोकुळ गीतेंचा दावा अखेर निकालाच्या दिवशी खरा ठरला आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.