मुंबई, (प्रतिनिधी) २२ जून - मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या 'बेस्ट' उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर बेस्ट कर्मचारी कृती समितीने आपला प्रस्तावित संप मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा केली असून, मुंबईतील बेस्ट बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, आमदार मुरजी पटेल, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय:
प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम मिळणार: बेस्ट कर्मचाऱ्यांची बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली ग्रॅच्युईटीची (उपदान) संपूर्ण रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मासिक वेतनात हंगामी वाढ: नवीन वेतन करार होईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून बेस्टच्या नियमित कर्मचाऱ्यांना ३,००० रुपये आणि वेटलिजवर (भाडेतत्वावरील बसेस) कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना २,००० रुपये मासिक हंगामी वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ताफ्यात ५,००० स्वमालकीच्या बसेस येणार: मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पुढील तीन वर्षांत ५,००0 नवीन बसेस थेट 'बेस्ट'च्या स्वतःच्या मालकीच्या खरेदी केल्या जातील. यासाठी आवश्यक असणारी आर्थिक तरतूद नियोजित पद्धतीने करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.
"बेस्टचा 'कायापालट' प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी आणणार"
"बेस्ट ही मुंबईची आणि मुंबईकरांची लाईफलाईन आहे, ती सक्षम करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बेस्ट प्रशासनाने तयार केलेला ‘कायापालट’ (पुनर्रचना) प्रस्ताव तातडीने शासनास सादर करण्याचे निर्देश दिले असून, त्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली जाईल."
— एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
प्रवाशांना दिलासा; बस सेवा सुरळीत होणार
गेल्या काही दिवसांपासून बेस्ट प्रशासनाचा ताण आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांमुळे मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, आज राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांवर आणि वेतन करारावर थेट आणि सकारात्मक तोडगा काढल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कृती समितीने संप मागे घेतल्यामुळे लाखो मुंबईकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून उद्यापासून सर्व बस सेवा पूर्ण क्षमतेने रस्त्यावर धावतील.