अंबाबाई मंदिर परिसर ६ महिन्यांत होणार हायटेक... 'काशी'च्या धर्तीवर... अमित शाह यांची घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 21-Jun-2026

कोल्हापूर, (प्रतिनिधी) २१ जून - 'दक्षिण भारताची काशी' आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. या संपूर्ण परिसराचा भव्य 'विकास कॉरिडॉर' म्हणून विकास करण्यासाठी तब्बल १५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केली. हा निर्णय देशातील सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित भव्य 'कृतज्ञता सोहळा' सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अनेक केंद्रीय व राज्यस्तरीय मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते.

६ महिन्यांत होणार विकास; ४१ मंदिरांचे जतन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "७ व्या शतकातील या प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिराच्या परिसरातील सुमारे ४१ छोट्या-मोठ्या मंदिरांचे मूळ वैभव जपून त्यांचे जतन व संवर्धन केले जाईल. पुढील ६ महिन्यांच्या आत हा कॉरिडॉर परिसर विकसित करण्यात येईल." याशिवाय मंदिर परिसरात अन्नछत्र सुरू करण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दर्शवली. "आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणारे हे सरकार आहे," असेही ते म्हणाले.

पुढील १०० वर्षांचा विचार करून विकास आराखडा: मुख्यमंत्री

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती पुनर्जीवित होत आहे. भाविकांना पुढील १०० वर्षे उत्तम सेवा आणि सुविधा मिळतील, असा व्यापक आराखडा राज्य सरकारने तयार केला आहे. कोल्हापूर हे केवळ शक्तिपीठ नसून सहकाराची आद्य पंढरी असल्याचे सांगत त्यांनी अमित शाह यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर परिसरातील आधुनिकीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाला प्रारंभ झाल्याचे सांगत, हे काम पूर्ण झाल्यावर कोल्हापूर आध्यात्मिक पर्यटनात एका वेगळ्या उंचीवर जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

अमित शाह यांनी कुटुंबासह घेतले महालक्ष्मीचे दर्शन

या भव्य सभेपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्नी सोनल शाह यांच्यासोबत श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन व आरती केली. मंदिरात नव्याने बसवण्यात आलेल्या सुवर्णकलशाची त्यांनी माहिती घेतली आणि परिसरातील कामांची पाहणी केली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी गृहमंत्र्यांचे स्वागत केले. कृतज्ञता सभेत संयोजकांच्या वतीने शाह यांना महालक्ष्मीची मूर्ती आणि तलवार देऊन सन्मानित करण्यात आले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.