जिल्हाध्यक्ष झालो तरी येवल्याशी नाळ कायम जोडलेली राहील... प्रत्येक मंगळवारी नागरिकांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार... दिलीप खैरे यांचे आश्वासन

Share:
Main Image
Last updated: 21-Jun-2026

येवला, (प्रतिनिधी) २१ जून - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीनंतर प्रथमच येवला दौऱ्यावर आलेल्या जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात गाव प्रमुख, बूथ प्रमुख, विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांची विस्तृत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, बूथ सक्षमीकरण, नवीन सदस्य नोंदणी, पक्षविस्तार आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिलीप अण्णा खैरे यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून जिल्हाध्यक्षपदापर्यंतच्या संघर्षमय, जिद्दी आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे म्हणाले की, आज मी जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत असलो तरी त्यामागे मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि येवला मतदारसंघात काम करण्याची मिळालेली संधी हेच खरे बळ आहे. येवल्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपविली असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

ते पुढे म्हणाले की, जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी वाढली असली तरी येवल्यात दर मंगळवारी आयोजित करण्यात येणारा जनता दरबार, आढावा बैठक आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे व्यासपीठ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. मी स्वतः प्रत्येक मंगळवारी येवल्यात उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार असून त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, बाळासाहेब कर्डक, युवा नेते संभाजी पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दत्ता निकम, संजय बनकर, ३८ गाव पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सचिन कळमकर, बाळासाहेब गुंड, प्रकाश वाघ, निसार निंबुवाले, बाळासाहेब पिंपरकर, एल. जी. कदम, पी. के. काळे, आर. डी. खैरनार, कांतीलाल साळवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रतन बोरनारे,  विनायक भोरकडे, भाजप नेते प्रमोद सस्कर, डॉ. श्रीकांत आवारे,  साहेबराव आहेर, ज्ञानेश्वर दराडे, डॉ. मोहन शेलार, योगेश निसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी गावपातळीपासून बूथपातळीपर्यंत प्रभावी नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच पक्षाची विचारधारा आणि विकासाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. दिलीप अण्णा खैरे यांच्या पहिल्याच येवला दौऱ्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांमधील प्रचंड उत्साह पाहता जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Advertisement

Comments

No comments yet.