मुंबई, (प्रतिनिधी) २० जून - "देशाची गुणवत्ताविषयक चाचणी व्यवस्था अधिकाधिक बळकट करणे हे भारतीय उत्पादनांच्या जागतिक दर्जाच्या स्पर्धात्मकतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. उत्तम चाचणी व्यवस्था आणि प्रमाणित पायाभूत सुविधा या ग्राहकांच्या हितांचे रक्षण, उत्पादनांची विश्वासार्हता वाढवणे आणि उद्योगस्नेही वातावरण निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरेल," असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज येथे केले.
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागांतर्गत असलेल्या ‘नॅशनल टेस्ट हाऊस’च्या (राष्ट्रीय चाचणी केंद्र) मुंबई प्रादेशिक कार्यालयातील चाचणी सुविधांच्या विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी आणि भूमिपूजन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार रवींद्र वायकर, ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे, अतिरिक्त सचिव रिचा मिश्रा आणि नॅशनल टेस्ट हाऊसचे महासंचालक डॉ. आलोक कुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 'सॅटेलाईट सेंटर'चे उद्घाटन
या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते देशातील तीन महत्त्वाच्या आधुनिक चाचणी सुविधांचे डिजिटल प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले:
१. नॅशनल टेस्ट हाऊस, मुंबई: सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळा (Microbiological Testing Laboratory).
२. छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र): एनआयसीडीसी, ऑरिक (AURIC) सिटी येथील 'NTH-AURIC' सॅटेलाईट सेंटर.
३. गाझियाबाद (उत्तर क्षेत्र): पादत्राणे चाचणी सुविधा (Shoe Testing Facility).
'झिरो डिफेक्ट' उत्पादनांवर भर
"हा उपक्रम उद्योग, व्यापार आणि ग्राहक कल्याणाला प्राधान्य देत, जागतिक दर्जाच्या गुणवत्ता पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे."
— प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री.
औद्योगिक विकास आणि ग्राहक सुरक्षेला बळ
खासदार रवींद्र वायकर यांनी आपल्या भाषणात औद्योगिक विकास आणि ग्राहक कल्याण साधण्यासाठी चाचणी यंत्रणा मजबूत असण्याचे महत्त्व विशद केले. उद्घाटनानंतर मंत्री महोदयांनी मुंबईतील प्रयोगशाळेला भेट देऊन शास्त्रज्ञ आणि तांत्रिक तज्ज्ञांशी संवाद साधला आणि संस्थेच्या आधुनिकीकरण उपक्रमांचा आढावा घेतला.
या नव्या सुविधांमुळे देशातील उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळणार असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करणे उद्योगांना सोपे होणार आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ उत्कृष्टतेचा वारसा लाभलेले 'नॅशनल टेस्ट हाऊस' या नव्या विस्तारासह भारताच्या गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांमध्ये आपले अव्वल स्थान अधिक मजबूत करेल, असा विश्वास ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी व्यक्त केला.