सिंहस्थापूर्वी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये उभे राहणार हे मॉडेल... महिला बचत गटांना मिळणार रोजगार...

Share:
Main Image
Last updated: 20-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० जून - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पर्यावरणपूरक आणि शून्य-कचरा (झिरो वेस्ट) पद्धतीने पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने एक मोठे पाऊल उचलले आहे. मंदिरांमध्ये जमा होणाऱ्या निर्माल्याचे गोदावरी नदी पात्रात होणारे विसर्जन रोखून, त्याचे वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण आणि प्रक्रिया केली जाणार आहे. या ‘वेस्ट टू वेल्थ’ (कचऱ्यातून समृद्धी) संकल्पनेतून थेट रोजगारनिर्मितीवर भर दिला जाणार असून, यासाठी मंदिर संस्थानांनी कुंभमेळा प्राधिकरणासोबत एकत्र येत पुढाकार घेतला आहे.

गुरुवारी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सहधर्मादाय आयुक्त विवेक सोनुने, एम. पी. पवार यांच्यासह नाशिक, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ, काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, कपालेश्वर महादेव मंदिर यांसह नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख मंदिर संस्थानांचे प्रतिनिधी, महापालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

नदी प्रदूषण रोखणार; मंदिरांमध्येच होणार वर्गीकरण

बैठकीत गोदावरी नदी व इतर जलस्रोतांमध्ये निर्माल्य टाकण्यास पूर्णपणे प्रतिबंध घालण्यावर एकमत झाले. यासाठी प्रत्येक मंदिराच्या स्तरावरच भाविकांनी अर्पण केलेल्या निर्माल्याचे स्वतंत्र संकलन आणि वर्गीकरण केले जाईल. मंदिर परिसरात स्वतंत्र संकलन केंद्रे उभारून, गोळा झालेले निर्माल्य प्रक्रिया संस्थांकडे सोपवले जाईल.

"सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ही केवळ एक तात्पुरते आयोजन नसून लोकसहभागातून कायमस्वरूपी शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याची संधी आहे. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या निर्माल्याचे व्यवस्थापन तितक्याच जबाबदारीने व्हावे, यासाठी आम्ही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये एक कायमस्वरूपी मॉडेल उभे करत आहोत."

— शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण.

निर्माल्यापासून अगरबत्ती आणि खतनिर्मिती; रोजगाराची संधी

Advertisement

संकलित केलेल्या निर्माल्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून उच्च दर्जाचे कंपोस्ट खत, सुगंधी अगरबत्ती, धूप आणि इतर पर्यावरणपूरक उत्पादने तयार केली जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक महिला बचत गट आणि नागरिकांना सामावून घेतले जाणार असल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

जबाबदाऱ्यांचे असे असणार विभाजन:

कुंभमेळा प्राधिकरण: संपूर्ण प्रकल्पाचे समन्वय, आवश्यक परवानग्या आणि अंमलबजावणीवर देखरेख ठेवणार.

मंदिर संस्थाने: मूळ ठिकाणी निर्माल्याचे वर्गीकरण करणे, भाविकांमध्ये जनजागृती करणे आणि संकलनासाठी जागा उपलब्ध करून देणे.

प्रक्रिया संस्था: निर्माल्य गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि मूल्यवर्धित उत्पादने तयार करून त्यांची विक्री करणे.

या प्रकल्पासाठी खासगी कंपन्यांचा सीएसआर (CSR) निधी आणि सहभाग मिळवण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंहस्थापूर्वी हे मॉडेल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून पर्यावरण संवर्धनाचा एक नवा वस्तूपाठ नाशिकमधून दिला जाणार आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.