नाशिक, (प्रतिनिधी) १९ जून - शहरातील उपनगर आणि आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा खून करून तिचे प्रेत ट्रॅव्हल्स बॅगेत भरून नदीकिनारी फेकून देण्याच्या धक्कादायक गुन्ह्याचा छडा लावण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून हा निर्घृण खून करण्यात आल्याचे समोर आले असून, गुन्हे शोध पथकाने केवळ २४ तासांत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा अहोरात्र पाठलाग करून त्याला कर्नाटक राज्यातून बेड्या ठोकल्या आहेत. गोपीनाथ रवींद्र गोसावी (वय ३३, रा. राहुल नगर, उपनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
असा उघडकीस आला गुन्हा
आडगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर (गुरंनं २३६/२०२६ भा.न्या. संहीता क. १०३(१), २३८) मृत अनोळखी महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मिलिंद बागुल यांना एक अत्यंत महत्त्वाची गोपनीय माहिती मिळाली. मृत महिला ही 'सुनिता विश्वकर्मा' असून, अनैतिक प्रेमसंबंधातून तिचा प्रियकर गोपीनाथ रवींद्र गोसावी यानेच तिचा खून केला व तो सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
कल्याण, रत्नागिरी, गोवा ते कर्नाटक... २४ तास थरारक पाठलाग!
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने आडगाव व उपनगर पोलिसांचे संयुक्त विशेष पथक तयार करण्यात आले. आरोपी नाशिकमधून पसार होऊन सातत्याने त्याचे ठिकाण बदलत होता.
पोलिसांच्या पथकाने मानवी कौशल्य आणि तांत्रिक विश्लेषणाचा (Technical Analysis) आधार घेत संशयिताचा कल्याण, रत्नागिरी, गोवा असा २४ तास अहोरात्र थरारक पाठलाग केला. अखेर तो कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथील नार्थन पोलीस ठाणे परिसरात असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी त्याला तिथून ताब्यात घेतले.
गुन्ह्याची दिली कबुली; ट्रान्झिट रिमांडवर नाशिकमध्ये आणले
पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर संशयित आरोपी गोपीनाथ गोसावी याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने सुनिता विश्वकर्मा हिचा खून केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला कर्नाटक येथील न्यायालयात हजर करून 'ट्रान्झिट रिमांड' (Transit Remand) मिळवला आणि त्याला पुढील तपासासाठी आडगाव पोलीस ठाण्यात आणले आहे.
या पथकाने बजावली उल्लेखनीय कामगिरी
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त मोनीका राऊत, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, वपोनि जयंत शिरसाठ, पोनि दिलीप राठोड, पोनि शिवाजी अहिरे, सपोनि निखील बोंडे, पोउनि विकास पंचमुख, पोउनि प्रभाकर सोनवणे यांच्यासह पोलीस अंमलदार मिलिंद बागुल, संदीप पवार, पंकज कप्पे, दादासाहेब वाघ, इम्रान शेख व तांत्रिक विश्लेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.