नाशिक, (प्रतिनिधी) १९ जून - किरकोळ वादाची कुरापत काढून एका टोळक्याने कारचालकास रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील विल्होळी शिवारात घडली आहे. या मारहाणीदरम्यान संशयितांनी कारचालकाच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची आणि कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत खरात, राज खरात (दोघे रा. गौतमनगर, गरवारे), गौतम बागुल आणि मिलिंद खिल्लारे (दोघे रा. कवटेकरवाडी, पाथर्डी फाटा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत आनंद भगवान शिंदे (रा. राजवाडा, विल्होळी, नाशिक) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकी घटना काय घडली?
फिर्यादी आनंद शिंदे हे आपल्या पत्नी आणि मुलीला सोबत घेऊन मंगळवारी (१६ जून) सिडको भागात आले होते. काम आटोपून पवननगर येथून ते कारने आपल्या विल्होळी येथील घराकडे परतत असताना, महामार्गावरील हॉटेल कॉटेजसमोर संशयित टोळक्याने त्यांची कार अडवली.
संशयित प्रशांत खरात याने कारजवळ येत शिंदे यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "तू आमच्याकडे अंबड एमआयडीसीत कसे काय काम करतो?" असा जाब विचारत त्याने वाद उकरून काढला. त्यावर शिंदे यांनी "माझे अंबड आणि विल्होळी दोन्ही भागात काम चालते," असे सांगून संशयितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
कारबाहेर ओढून मारहाण; पोटाला दिला चटका
शिंदे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, संशयित अधिकच भडकले. त्यांनी शिंदे यांना जबरदस्तीने कारबाहेर ओढले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीदरम्यान एका संशयिताने शिंदे यांच्या पोटाला कोणत्यातरी वस्तूने चटका दिला. या झटापटीत शिंदे यांच्या खिशातील ४०० रुपये कुठेतरी पडून गहाळ झाले.
पोलिसात धाव; तपास सुरू
भररस्त्यात झालेल्या या जीवघेण्या मारहाणीमुळे आणि टोळक्याने दिलेल्या गंभीर धमक्यांमुळे शिंदे कुटुंबाने तातडीने नाशिक तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी फिर्यादीवरून चारही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. महामार्गावर घडलेल्या या गुंडगिरीच्या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.