अपघाताची माहिती ॲपवर भरण्यासाठी मागितली लाच... दोन पोलीस नाईक अन् चालक रंगेहात जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 19-Jun-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १९ जून - भावाच्या अपघाताचा गुन्हा दाखल करून त्याची माहिती 'iRAD' (एकात्मिक रस्ते अपघात डेटाबेस) ॲप्लिकेशनमध्ये भरण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील एका पोलीस चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या प्रकरणी लाचेची मागणी करून चालकाला लाच घेण्यास सांगणाऱ्या दोन पोलीस नाईक आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या लाचखोरीप्रकरणी १) नितीन अशोक गाडगे (वय ४४, पोलीस नाईक), २) राजेश रावसाहेब जाधव (वय ३८, पोलीस नाईक) आणि ३) दादाराम शिवराम म्हस्के (वय ५६, चालक पोलीस नाईक) अशा तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जात आहे.

नेमके प्रकरण काय?

या प्रकरणातील तक्रारदार यांच्या भावाचा १ जून २०२६ रोजी अपघात झाला होता. त्यांच्यावर दौंड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना दौंड पोलिसांनी हे अपघाताचे प्रकरण पुढील कारवाईसाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पाठवले होते. या अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस नाईक नितीन गाडगे यांच्याकडे प्रलंबित होते.

तक्रारदाराने गाडगे यांची भेट घेतली असता, त्यांनी अपघाताची माहिती 'iRAD' ॲप्लिकेशनमध्ये भरण्याचे काम पाहणारे त्यांचे मदतनीस पोलीस नाईक राजेश जाधव यांची भेट घेण्यास सांगितले. या दोघांनी मिळून तक्रारदाराकडे सुरुवातीला १०,००0 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत १६ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार दिली. त्यानंतर झालेल्या पडताळणीत तडजोडीअंती ७,००० रुपये लाच देण्याचे निश्चित झाले.

Advertisement

सरकारी वाहनाच्या चालकामार्फत घेतली लाच!

आज, १८ जून रोजी लाच मागितल्याची खात्री करण्यासाठी पुन्हा पडताळणी करण्यात आली. यावेळी पोलीस नाईक राजेश जाधव याने स्वतः लाच न घेता, तक्रारदाराला शासकीय वाहनावरील चालक दादाराम म्हस्के याला भेटण्यास सांगितले. म्हस्के याला या कामाचा कोणताही अधिकार नसताना त्याने इतर दोन्ही आरोपींच्या सांगण्यावरून ७,००० रुपयांची लाच स्वीकारण्याची संमती दर्शवली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने चालक दादाराम म्हस्के याला ७ हजार रुपयांच्या लाच रकमेसह रंगेहात ताब्यात घेतले.

एसीबीचे कारवाई पथक आणि मार्गदर्शन:

ही यशस्वी कारवाई ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित शिपुटे व सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, किशोर कुलधरण, शेखर वाघ आणि चालक दशरथ लाड यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.